लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): महाराष्टÑ शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात गुटखा बंदी केलेली असताना सोनपेठमध्ये मात्र गुटख्याची सर्रास विक्री व साठे केले जात आहेत. अन्न-औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून तालुक्यात कायद्याची पायमल्ली होताना दिसून येत आहे.सोनपेठ शहर आणि ग्रामीण भागातील गल्लीबोळातही गुटखा विक्री केली जाते. व्यसनाच्या आहारी गेलेली तरूण पिढी अव्वाच्या सव्वा किंमतीला गुटखा विकत घेऊन खाताना दिसत आहे. एक रूपयाला मिळणारी गुटख्याची पुडी बंदी असल्याने आता पाच रुपयांना विक्री होत आहे. महिन्याकाठी लाखो रुपयांची कमाई गुटखामाफिया करीत आहेत. अन्न-औषध प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील काही मुुख्य भागात गुटख्याचा मोठा साठा केलेला असतानाही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. कायद्याने या व्यवसायाला बंदी असताना खुलेआम गुटख्याचा साठा आणि विक्री होत असल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणारे दुर्धर आजार कमी व्हावेत म्हणून शासन कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती करीत असतानाच सोनपेठमध्ये मात्र या कायद्याला धाब्यावर बसविण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे.
परभणी : सोनपेठ शहरात सर्रास गुटखा विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:05 IST