लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील तहसील कार्यालयातील कागदपत्रांमध्ये खाडाखोड करुन बनावट जात प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सय्यद अबरार इलाही याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.परभणी तहसील कार्यालयातील कागदपत्रांमध्ये खाडाखोड करुन बनावट जात प्रमाणपत्र दिल्या प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या फिर्यादीवरुन प्रारंभी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी सय्यद अबरार इलाही व शेख शफादेह शेख फारुख या दोन आरोपींना ६ नोव्हेंबर रोजी रात्री अटक केली होती. हे आरोपी प्रारंभी पोलीस कोठडीत व त्यानंतर न्यायालयीन कोठडीत होते. आरोपी सय्यद अबरार इलाही याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर तीन दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती. त्यानंतर या प्रकरणी न्यायाधीश डी.व्ही.कश्यप यांनी शुक्रवारी सायंकाळी निकाल देत आरोपी सय्यद अबरार इलाही याचा जामीन मंजूर केला.दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला तरी अन्य एकाही आरोपीला अटक केलेली नाही. शिवाय आरोपीच्या संख्येमध्येही कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही, हे विशेष होय.
परभणी : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात एका आरोपीस जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:35 IST