परभणी : कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या येथील आयटीआय कोरोना हॉस्पिटलमध्ये मागील दीड महिन्यांमध्ये ९१६ रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी ६४९ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले आहे.
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने धास्ती निर्माण झाली आहे. या रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना कोरोनातून बाहेर काढण्याचे काम वैद्यकीय अधिकारी युद्धपातळीवर करीत आहेत. परभणी शहरात आयटीआय येथील कोरोना हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आयटीआय हॉस्पिटल हे जिल्ह्यातील मुख्य कोरोना रुग्णालय आहे. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांचा ओढा मोठ्या प्रमाणात आहे. एकूण २०० खाटांची सुविधा असलेल्या या रुग्णालयांमध्ये १ मार्च ते १० एप्रिल या दीड महिन्यांच्या कालावधीत ९१६ रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी ६४९ रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले आहे. या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी ७६ रुग्ण सध्या कमी लक्षणे असल्यामुळे त्यांच्या घरी उपचार घेत आहेत. या रुग्णालयात सध्या १६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
एकीकडे शासकीय रुग्णालयात सुविधा मिळत नाहीत, अशी ओरड होत असली तरी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी मात्र रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. वाढलेली रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णसेवा कमी पडत असेल. परंतु, रुग्णांना बरे करण्याची टक्केवारी या रुग्णालयात अधिक आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळत आहे.
आयसीयूमधील ९४ रुग्णांची कोरोनावर मात
आयटीआय कोविड हॉस्पिटलमध्ये १ जानेवारी ते ३१ मार्च या काळात १५१ रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. त्यापैकी ९४ रुग्ण बरे झाले आहेत. ४५ रुग्णांचा याठिकाणी मृत्यू झाला आहे. आयसीयूमध्ये दाखल झाल्यानंतर रुग्णांना कोरोनामुक्त करण्याचे प्रमाण या रुग्णालयात अधिक आहे.
स्वच्छतेसाठी एजन्सी
आयटीआय येथील कोरोना रुग्णालयात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. या एजन्सीच्या माध्यमातून संपूर्ण रुग्णालय परिसरातील कचरा उचलणे तसेच इतर स्वच्छतेची कामे केली जात आहेत.
मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध
आयटीआय हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुबलक प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांना सुविधा देताना कोणत्याही अडचणी निर्माण होत नाहीत. या रुग्णालयात सध्या १२ एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी, ६ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी तसेच २ फार्मसिस्ट आणि ९८ परिचारिकांचा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयात मनुष्यबळाची कोणतीही अडचण नसल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
६० टक्के
खाटांना ऑक्सिजन
रुग्णालयात १८० खाटांची सुविधा असून, त्यापैकी १०० खाटांना ऑक्सिजनची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना त्वरित ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिला जातो.