परभणी : पणन महासंघाकडून कापूस खरेदीसाठी एसएमएस संदेश पाठवूनही १३ हजार २१८ शेतकऱ्यांनी अद्याप कापूस विक्रीसाठी आणला नसून या शेतकऱ्यांना आता ५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघाने हमीभावाने कापूस खरेदीसाठी परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत ७ केंद्र सुरु केले आहेत. पणन महासंघाने आतापर्यंत नोंदणी केलेल्या १८ हजार १८ शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठवून कापूस विक्रीसाठी आणण्याचे आवाहन केले होते. मात्र २९ जानेवारीपर्यंत ४ हजार ८०० शेतकऱ्यांनीच कापसाची विक्री केली आहे. या काळात १ लाख ४० हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी १३ हजार २१८ शेतकऱ्यांनी अद्यापही कापूस विक्रीसाठी आणलेला नाही. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरही काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर संदेश प्राप्त झाला नसावा किंवा अन्य काही कारणांमुळे या शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणला नाही, असे गृहित धरुन एसएमएस पाठविलेल्या शेतकऱ्यांना पणन महासंघाच्या केंद्रावर कापूस विक्री करण्यासाठी ५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची खरेदी संदर्भातील कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही. त्याच प्रमाणे नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस विक्री करणे शिल्लक आहे. या शेतकऱ्यांना कापूसही खरेदी केला जाणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समशेर वरपूडकर, उपसभापती दिलीपराव आवचार, सचिव संजय तळणीकर व संचालकांनी दिली आहे.
भाव वाढल्याचा परिणाम
कापूस पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर कापसाला ५ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव दिला जात आहे. मात्र या उलट खुल्या बाजारपेठेमध्ये कापसाचे भाव वाढले आहेत. व्यापारी ५ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल या दराने कापूस खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतरही हमीभाव केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.