जिल्ह्यातील प्रत्येक खासगी रुग्णालयाने बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार शहरी भागात नगरपालिकेकडे किंवा महानगरपालिकेकडे, तर ग्रामीण भागात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे रीतसर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर संबंधित रुग्णालयांची वैधता तीन वर्षांपर्यंतच असते. असे असताना जिल्ह्यात अनेक रुग्णालयांनी या नोंदणीकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.
सोनपेठ शहरात एकाही रुग्णालयाची नोंद नाही
सोनपेठ शहरात एकाही खासगी रुग्णालयाची नगरपालिकेकडे नोंद नाही. शहरात जवळपास ३० खासगी दवाखान्यांची संख्या आहे. असे असताना या दवाखान्यांनी नगरपालिकेकडे नोंद का केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
नोंदणी न केल्यास होणार कारवाई...
बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट या कायद्याच्या कलम २७ नुसार नोंदणी नसणाऱ्या रुग्णालयांना १० हजार रुपये दंड व तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद केली आहे. नोंदणी केल्यानंतर याची वैधता तीन वर्षांपर्यंतच आहे. या कायद्याचे पालन करणे बंधनकारक आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
परभणी १३९
पाथरी २९
सेलू ३२
मानवत ४५
सोनपेठ ००
गंगाखेड १३
पालम ०६
पूर्णा ००
जिंतूर ४५