लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मागील वर्षभरात डिझेलचे दर साधारणत: ३० टक्क्यांनी वाढल्याने त्याचा फटका किराणा बाजारपेठेला बसला असून, किराणा साहित्याचे दर ४० टक्क्यांनी वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील बाजारपेठ बंद आहे. अनेक उद्योग, व्यवसाय बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात असतानाच डिझेलच्या दरवाढीने महागाईत तेल ओतले आहे. मागील वर्षभरात डिझेलचे दर ३० टक्क्यांनी वाढल्याने वाहतूक खर्च वाढला. त्यामुळे किराणा मालाच्या किमतीतही वाढ झाली आहे. यामुळे महिनाभराच्या किराणाचे बजेट वाढत असून, सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
हरभरा डाळ, मूगडाळ, साखर यासह खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. मागील वर्षी १४५ रुपये किलो दराने मिळणारे शेंगदाणा तेल १९० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. सूर्यफूल तेल आणि इतर खाद्यतेलांच्या किंमतीदेखील याच पटीने वाढल्या आहेत. महागाईने नागरिकांना जेरीस आणले आहे. संचारबंदीतील आर्थिक नुकसानासोबत आता नागरिकांना महागाईच्या झळाही सहन कराव्या लागत असल्याने नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत.
संचारबंदीमुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच किराणा बाजारपेठेत सर्वच वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे महिन्याचे आर्थिक गणित बिघडत आहे. वाढलेल्या महागाईमुळे आर्थिक ताळमेळ जुळवताना कसरत करावी लागते.
रेवती मुळे, गृहिणी
इंधनाच्या दराबरोबरच खाद्यपदार्थांचेही दर वाढल्याने अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. महिन्याच्या किराणासाठी दीडपट रक्कम अधिक लागत असून, महिन्याचे आर्थिक गणित बिघडत आहे. महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
शुभांगी परळीकर, गृहिणी
डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला. त्याचप्रमाणे संचारबंदीचाही परिणाम झाला आहे. मजुरीही तेवढीच वाढली आहे. या सर्वांचा परिणाम बाजारपेठेतील दरवाढीवर झाला आहे. मागील काही दिवसांपासून खाद्यतेल आणि इतर पदार्थांचे भाव वाढले आहेत.
श्रीनिवास रुद्रवार, कोषाध्यक्ष, व्यापारी संघटना.