नारायण चाळ रस्त्याची दुरवस्था
परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीपासून नारायण चाळ कॉर्नरपर्यंतचा रस्ता खराब झाला. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, वाहनधारकांना खड्डे चुकवत वाहने चालवावी लागत आहेत. त्यातच हा रस्ता अरुंद असल्याने वाहनधारकांच्या गैरसोयीत आणखीच भर पडत आहे. मपाने खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
जाम नाक्यावरील अतिक्रमणे झाली पक्की
परभणी : जिंतूर रस्त्यावरील जाम नाका परिसरात मागील काही वर्षांपासून फळ विक्रेत्यांनी अतिक्रमणे केली आहेत. राष्ट्रीय महामार्गावर विक्रेत्यांनी अतिक्रमणे केल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या फळ विक्रेत्यांकडे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना रस्त्यावर उभे राहूनच खरेदी करावी लागते. तेव्हा ही बाब लक्षात घेता, या मार्गावरील अतिक्रमणे हटवावित, अशी मागणी होत आहे.
स्टेडियममधील स्वच्छतागृहाची दुरवस्था
परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणात घाण झाली असून, हे स्वच्छतागृह वापर योग्य राहिले नाही. त्यामुळे खेळाडूंना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.
स्टेडियम परिसरातील चौक बनला धोकादायक
परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील महात्मा फुले यांच्या पुतळा परिसरात चौकाची आखणी करण्यात आली नाही. त्यामुळे चारही बाजूने येणारी वाहने या चौकात येऊन धडकतात. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मनपाने या ठिकाणी चौकाची उभारणी करावी, अशी वाहनधारकांची मागणी आहे.
इमारतीचे बांधकाम संथगतीने
परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. या इमारतीत सध्या आतील कामे केली जात आहेत. ही कामे संथगतीने होत असल्याने या इमारतीत जि.प.चे कामकाज कधी सुरू होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कृषी विद्यापीठातील रस्त्यांची दुरवस्था
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे शहराला लागून असलेल्या गावांतील ग्रामस्थांना परभणी शहरात येण्यासाठी हाच मुख्य मार्ग आहे. तेव्हा या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.