परभणी : येथील जिल्हा रुग्णालयासह इतर सरकारी रुग्णालयांमधील कोरोना वगळता इतर आजारांच्या रुग्णांची संख्या अद्यापही वाढलेली नाही. २०१९ मध्ये तब्बल ३ लाख रुग्णांची तपासणी करणाऱ्या जिल्हा रुग्णालयात यावर्षी मात्र केवळ ६६ हजार रुग्णच उपचारासाठी दाखल झाले. त्यामुळे आजार पळाले, की कोरोनाची भीती कायम आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
२०२० मध्ये एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाच्या महामारीने हाहाकार माजविला. आरोग्य विभागही कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी गुंतला होता. मात्र, याच काळामध्ये इतर आजारांचे रुग्णच रुग्णालयात दाखल होत नसल्याची बाब प्रकर्षाने जाणवली. रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, श्वसनाचे विकार, अपघात यासारख्या रुग्णांची संख्या शून्यावर आली होती. साधारणपणे ५ महिन्यांपर्यंत सरकारी रुग्णालय म्हटले की, कोरोनाचाच रुग्ण, अशी परिस्थिती जिल्हावासीयांनी अनुभवली. मात्र, आता रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. जिल्हा रुग्णालयातही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होत नाहीत, असे असतानाही इतर आजारांच्या रुग्णांची संख्या घटलेलीच आहे. २०१९ मध्ये नोव्हेंबर महिन्यात जिल्हा रुग्णालयात ३५ हजार रुग्णांची तपासणी झाली. मात्र, २०२० मध्ये याच महिन्यात केवळ १५ हजार ९५९ रुग्णांची तपासणी झाली आहे. त्यावरून रुग्णसंख्या घटल्याचे दिसत आहे.
आजार पळाले की, कोरोनाची भीती
कोरोनाच्या संसर्ग काळात जिल्हा रुग्णालयातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती. ती ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत काही प्रमाणात वाढली असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत मात्र ती निम्मीच आहे. त्यामुळे इतर आजारांचे रुग्ण जातात कुठे? त्यांच्या मनात अजूनही कोरोनाची भीती आहे का? असे प्रश्न उपस्थित होत असून, सध्याच्या आकडेवारीवरून ही भीती कायम असल्याचे दिसत आहे.