परभणी जिल्ह्यात १५ जुलैपासून आठवी ते बारावीच्या वर्गांना प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी ३८८ पैकी २६२ शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद दिसून आला नाही. एकूण १ लाख ११ हजार ४१४ विद्यार्थ्यांपैकी १५ हजार १९२ विद्यार्थ्यांनीच पहिल्या दिवशी हजेरी लावली. दुसरीकडे, शिक्षकांच्या लसीकरण व कोरोना चाचणीची माहिती शिक्षण विभागालाच नाही.
१३.६२ टक्केच विद्यार्थी शाळेत
जिल्ह्यात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती फक्त १३.६२ टक्के होती. जिल्हा परिषदेच्या ९ हजार ४६४ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार १६७, तर खासगी शाळांमधील १ लाख १ हजार ९५० विद्यार्थ्यांपैकी १२ हजार २५ विद्यार्थीच शाळेत आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती कमीच आहे.
पहिल्या दिवशी ३६२ शाळा उघडल्या
पहिल्या दिवशी जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या ३८८ पैकी ३६२ शाळा उघडल्या. २६ शाळा सुरू झाल्या नाहीत.
राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात १५ जुलैपासून आठवी ते बारावीच्या ३८८ पैकी ३६२ शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी प्रतिसाद कमी असला तरी तो नंतर वाढणार आहे. शाळेमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश मुख्याध्यापकांना दिले आहेत.
- विठ्ठल भुसारे, शिक्षणाधिकारी
एका दिवसात चाचणी करायची कशी?
शाळेत हजर राहण्यासाठी व कामकाज करण्यासाठी कोरोना चाचणी करण्याचा नियम घालण्यात आला; पण चाचणी करण्यासाठी अनेक अडथळे येतात. कोरोनाच्या लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या अनुषंगाने उपस्थित राहताना अन्य काळजी घेतली जात आहे.
- रामदास तुम्मेवार, शिक्षक.
शाळेत हजर राहण्यासाठी शिक्षण विभागाने सांगितल्याप्रमाणे कोरोनाचे लसीकरण पूर्ण केले आहे. चाचणी करण्याबाबत मात्र एक दिवस आधी कळले. यामुळे चाचणी केली नाही.
- सुभाष ढगे, शिक्षक.