परभणी : मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटली आहे ; टेस्टिंगचे प्रमाणही कमी झाल्याचा हा परिणाम आहे. घटलेल्या टेस्टिंग, लसीचा तुटवडा, ऑक्सिजन, रेमडेसीविर इंजेक्शनच्या तुटवडा या प्रश्नांमुळे कोरोनाची तिसरीला लाट रोखायची कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे.
नवीन रुग्ण कमी झाल्याने ३ दिवसांपासून दिलासा मिळत आहे ; परंतु त्यासाठी कोरोनाच्या टेस्टिंग कमी होणे, हे प्रमुख कारण आहे. सध्या शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात बाधित रुग्ण अधिक आहेत. विशेष म्हणजे, बहुतांश रुग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेतात. सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे आढळल्यास त्वरित आरटीपीसीआर करण्याऐवजी घरगुती आणि खासगी डॉक्टरांनी दिलेली औषधी घेऊन तात्पुरता उपचार केला जात आहे. आजार बळावल्यानंतर हेच रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल होतात. तेव्हा त्यांची प्रकृती अधिकच खालावलेली असते. शिवाय या रुग्णांमुळे कोरोनाचा संसर्ग घरातील इतर रुग्णांपर्यंत पोहाेचलेला असतो. त्यामुळे ग्रामीण भागात संसर्ग झपाट्याने वाढत आहे.
आरोग्य विभागाने महिनाभरापूर्वी जिल्ह्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढविले होते. दररोज ३ हजारांपर्यंत टेस्टिंग केल्या जात असे ; परंतु हे प्रमाण आता ५० टक्क्यांनी घटली आहे. दिवसाकाठी एक ते दीड हजार तपासण्या होत आहेत. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्याही मर्यादित राहत आहे.
दुसरीकडे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले ; परंतु जिल्ह्यात लसीचा साठा उपलब्ध नाही. लस घेण्यासाठी केंद्रांवर रांगा आहेत. मोठे प्रयत्न केल्यानंतरही लस उपलब्ध होत नसल्याने काहीशी उदासीनता निर्माण झाली आहे. आरोग्य यंत्रणेच्या या ढिसाळ कारभारामुळे कमी झालेला संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाची अशी दुर्दशा असेल तर ही तिसरी लाट रोखायची कशी? असा प्रश्न सतावत आहे. दुसऱ्या लाटेतच रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा कमी पडत आहे. त्यातही रेमडेसिविर, ऑक्सिजन, कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाला मोठी तयारी करण्याची गरज आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच गुंडाळल्या
एखाद्या नागरिकास कोरोनाची लक्षणे जाणवल्यानंतर त्या नागरिकांच्या संपर्कातील २० जणांना शोधून त्यांच्या आरटीपीसीआर करण्याचे लक्ष्य प्रशासनाने दिले आहे.
राज्य शासनाच्या या निर्देशानुसार सुरुवातीच्या काळात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण जिल्ह्यात बऱ्यापैकी वाढले होते. मात्र मागील काही दिवसांपासून कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण घटले आहे. कोरोना संसर्ग शहरी भागातून ग्रामीण भागात गेल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगकडे फारसे लक्ष दिले जात नाही.
बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना शोधण्यासाठी शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र आरोग्य विभाग आणि या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. परिणामी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण संख्येत वाढ होण्याची भीती वर्तविली जात आहे.
लसीकरणाचा ही खेळखंडोबा
जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ही खेळखंडोबा झाला आहे. १८ ते ४४ वर्षापर्यंतच्या नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने समोर ठेवले असले तरी प्रत्यक्षात या नागरिकांसाठी पुरेल एवढी लस जिल्ह्याला मिळाली नाही. १८ ते ४४ या वयोगटात १२ लाख नागरिक असून त्या तुलनेत आतापर्यंत केवळ ३५ हजार लस जिल्ह्याला प्राप्त झाली आहे.