परभणी : जिल्ह्यातील ७५ प्राथमिक आरोग्य केंद्रांत केवळ ६६ एमबीबीएस डॉक्टर्स कार्यरत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील या केंद्रांना एमबीबीएस डॉक्टर देता का डॉक्टर असेच म्हणावे लागत असल्याची स्थिती दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांना गावातच पूर्ण क्षमतेने वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्ह्यात ७५ प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली. या प्राथमिक आरोग्य केंद्रात एका एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली. मात्र, मागील काही दिवसांपासून या आरोग्य केंद्रांना रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. ७५ केंद्रांमध्ये केवळ ६६ एमबीबीएस डॉक्टर्स कार्यरत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय गाठावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्याचबरोबर आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने या केंद्रांत रिक्त असलेली ९ एमबीबीएस डॉक्टर्सची पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी होत आहे.
सुविधांचा अभाव
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बहुतांश वेळा डॉक्टर्स हजर नसतात. एखाद्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळाल्यानंतर या केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ७५ प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णांना आवश्यक असणाऱ्या औषधांचा साठा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात ७५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यामध्ये ६६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरलेली आहेत. रिक्त असलेल्या जागेवर नवीन अधिकारी मिळावा, यासाठी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.
डॉ. शंकर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी, परभणी