सूचनाफलक लावण्याकडे दुर्लक्ष
पालम : शहरातील गंगाखेड-लोहा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी बांधकाम विभागाच्या वतीने रेडिमयच्या खुणा व सूचनाफलक लावण्यात आलेले नाही. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. गेल्या आठवड्यातच अपघाताची घटना घडली आहे. मात्र याकडे सा.बां. विभाागचे दुर्लक्ष होत आहे.
मानवत तालुक्यात गुटखा विक्री वाढली
मानवत : राज्यभरात गुटख्यास बंदी असताना मानवत तालुक्यात मात्र अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई होत नसल्याने गुटखा विक्री वाढली आहे. मानवत शहरासह ग्रामीण भागातही सर्रास गुटखा उपलब्ध होत आहे. संबंधितांचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
अग्निशमन यंत्र बसविण्याकडे दुर्लक्ष
मानवत : शहरातील तहसील, पंचायत समिती आदी शासकीय कार्यालयांत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन यंत्र बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे आश्वर्य व्यक्त होत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
घरकूल लाभार्थीना वाळू मिळेना
मानवत : तालुक्यात रमाई घरकूल योजनेंतर्गत घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थींना वाळू मिळत नसल्याने त्यांची बांधकामे ठप्प आहेत. या योजनेचे तालुक्यात जवळपास सव्वाशे लाभार्थी आहेत. शासनाच्या वतीने वाळू देण्याची घोषणा करण्यात आली होती. ती फोल ठरली आहे.
पुलाची उंची वाढविण्याची मागणी
पूर्णा : तालुक्यातील धानोरा काळे येथील गोदावरी नदीच्या पुलाची उंची वाढविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर हा पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे रहदारी ठप्प होते. याकडे लक्ष देऊन पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी आहे.