सार्वजनिक बांधकाम विभागाने चार वर्षांपुर्वी या रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण केले होते. त्यावेळी अतिक्रमणे काढण्यात आली होती. मात्र काही दिवसानंतर हळूहळू पुन्हा कच्चे व पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमणे करण्यात आली आहेत. चहा टपरी, पान टपरी, फळ विक्री दुकाने, मासे विक्री, खाद्यपदार्थ तसेच विविध व्यवसाय थटले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे बस स्थानक परिसरात हातगाडे रस्त्यावर लावली जात असल्याने वाहतूकीची कोंडी होत आहे. तसेच रेल्वे स्थानकासमोरील हाॅटेल चालक चक्क रस्त्यावर खुर्ची टाकून ग्राहकांना बसवत आहेत. काही वर्षांपूर्वी सा. बां. विभागाने अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावून अतिक्रमणे काढून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काहींनी स्व:ताहून अतिक्रमण काढले. पंरतु, नोटीस देऊन ही बांधकाम विभागाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली नाही. परिणामी दिवसेंदिवस अतिक्रमणात वाढ झाली आहे.
रायगड काॅर्नरला विळखा
रायगड काॅर्नर परिसरातात सर्वाधिक अतिक्रमणे वाढली आहेत. महावितरण कार्यालयाच्या समोरची जागा अतिक्रमण करून पूर्ण व्यापली आहे. परिणामी या चौकाची शोभा संपली असून अपघाताची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी पोलीस चौकी सुरू करणे आवश्यक झाले आहे.
जागा शासनाची; वसुली दुसऱ्यांची
मुख्य रस्त्यावरील जागेवर अतिक्रमण करून अनेकांनी पोट भाडेकरू ठेवले आहेत. तसेच हातगाडे लावण्यासाठी देखील काही लोक किराया वसूल करत आहेत. जागा शासनाची वसुली दुसऱ्यांची असा प्रकार होत आहे. तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत.
रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे
देवगावफाटा ते पाथरी हा पूर्वी राज्य मार्ग होता.मात्र एक वर्षापूर्वी हा मार्ग राष्ट्रीय महामार्गात वर्ग करण्यात आला आहे.
त्यामुळे रायगड काॅर्नर ते रेल्वे स्टेशन हा भाग देखील त्यातच आहे. आता हा रस्ता सां. बा. विभाग कडे नाही.
-पी एन कोरे, उपविभागीय अभियंता सां बा विभाग, सेलू