परभणी : कोरोनामुळे लग्न सोहळ्यांवर निर्बंध लावल्याने या सोहळ्यांमधून लग्नपत्रिका हद्दपार झाल्या असून, त्याचा फटका व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. मागील दीड वर्षात या व्यावसायिकांचे सुमारे साडेसहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
लग्न सोहळा म्हटला की, थाटमाट आलाच. धडाक्यात लग्न लावण्याची परंपरा येथे रूढ आहे. परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे या लग्न सोहळ्याला जवळपास निर्बंध आले आहेत. ठराविक वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत लग्न सोहळे उरकून घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले. त्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका लग्न पत्रिका बनवणाऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यात लग्नपत्रिका तयार करून देणाऱ्या व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. जवळपास साडेचारशेपेक्षा अधिक व्यावसायिक या क्षेत्रात काम करतात. मात्र, दीड वर्षांपासून लग्नपत्रिका तयार केल्या जात नसल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. विशेष म्हणजे, या व्यावसायिकांसह कामगारवर्गालाही इतरत्र काम शोधण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात लहान-मोठी सुमारे साडेचारशे प्रिंटर्स आहेत. लग्न सोहळ्याच्या हंगामात एका प्रिंटर्स व्यावसायिकाकडे किमान १० ते २० पत्रिका तयार केल्या जातात. प्रत्येक पत्रिकेवर साधारणत ५ हजार रुपयांचा खर्च होतो. एका हंगामामध्ये व्यावसायिक ५० हजार रुपयांपर्यंत उलाढाल करतो. मात्र, दीड वर्षांपासून ही उलाढाल ठप्प पडली आहे. यात सुमारे ६ कोटी ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हा व्यवसाय जवळपास ठप्प पडल्यात जमा झाला आहे. लग्न सोहळ्यासाठी लग्न पत्रिका तयार केल्या जात नसल्याने व्यावसायिकांना इतर व्यवसाय शोधावा लागत आहे. काहीजणांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी कापड व्यवसाय तर काहींनी हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायातील कामगारांनी औद्योगिक क्षेत्रात तसेच मिळेल त्या ठिकाणी मजुरीचे काम हाती घेतले आहे. कोरोनाने लग्न पत्रिकाच्या व्यवसायाला ग्रहण लावले असून, सध्या हा व्यवसाय ठप्प आहे.
तीन हंगामात नुकसान
मागील वर्षीच्या मार्च महिन्यानंतर लग्न सोहळे सुरू झाले होते. परंतु कोरोनाने लग्न सोहळे ठप्प झाले. दिवाळी सणानंतरही मोठ्या प्रमाणात लग्न तिथी होत्या. परंतु कोरोनाचे संकट कायम राहिले. आता यावर्षी मार्च महिन्यात पुन्हा लग्न सोहळे सुरू झाले आहेत. परंतु वऱ्हाडी मंडळींच्या मर्यादेचे शासनाचे निर्देश कायम आहेत. त्यामुळे मागील तीन हंगामापासून व्यावसायिकांना अडचणी येत आहेत.
लग्नपत्रिकाही ऑनलाईन
याच काळात अनेकांनी कॉम्प्युटरवर लग्नपत्रिका तयार करून सोशल मीडियावर निमंत्रणे दिली. त्यामुळेही प्रिंटिंग व्यवसाय अडचणीत आला आहे.