शहरात नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ३ जलकुंभ उभारण्यात आले आहेत. या जलकुंभाला जोडलेल्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. राजगोपालाचारी उद्यानातील जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून, १९ एप्रिल रोजी या भागातील जलवाहिनीची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी घेताना जलवाहिनीच्या दोन्ही बाजू सुरू ठेवून चाचणी घेतली जाते. त्यामुळे सोमवारी जलवाहिनीतून सोडलेले पाणी रस्त्यांवर वाहू लागले. मोठ्या प्रमाणात पाणी झाल्याने वाहनधारकांना या पाण्यातून मार्ग काढावा लागला. दरम्यान, ही चाचणी पूर्ण झाली असून, लवकरच शहरवासीयांना या जलकुंभातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील अमेयनगर आणि बाजार समिती परिसरातील जलकुंभाचीही सोमवारी चाचणी घेण्यात आली. त्यामुळे आता या जलकुंभातूनही पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांना वेळेत पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, चाचणी घेताना जलवाहिनी धुणे आवश्यक असते. त्यातील लिकेज चेक करावे लागतात. त्यामुळे रस्त्यावर पाणी वाहते. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
जलवाहिनीच्या चाचणीमुळे रस्त्यावर पाण्याचे लोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:18 IST