परभणी : ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
जि.प. अध्यक्ष निर्मलाताई विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची ऑनलाइन बैठक घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष अजय चौधरी, आरोग्य सभापती अंजलीताई आणेराव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे आदींची उपस्थिती होती. ग्रामीण भागातून कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात परभणी शहरात येत आहेत. त्यामुळे परभणीतील आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. विशेषत: यापूर्वी जिल्ह्यात ज्या नऊ ठिकाणी फिव्हर क्लिनिक स्थापन करण्यात आले होते. तेथे तातडीने पुढील आठवड्यापासून हे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करावे, असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी, अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १ हजार रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्काळ ५०० इंजेक्शनची मागणी नोंदवावी, असे आरोग्य विभागाला सांगण्यात आले.