केंद्र शासनाने २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला घरकुल मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेत प्रपत्र भरून घेण्यासाठी ऑनलाईन सर्वेक्षण मोहीम राबविली होती. गावपातळीवर ई-सॉफ्ट ॲपमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार ऑनलाईन याद्या तयार करण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येक कुटुंबातील लाभार्थ्याचे आधार जोडणी करण्यात आले. यासाठी तीन वेळा मुदत वाढवून देण्यात आली होती. आधार जोडणीनंतर ऑनलाईन यादीसाठी प्रत्येक कुटुंबातील लाभार्थ्याचे जॉब कार्ड मॅपिंग सक्तीचे करण्यात आले आहे. गाव पातळीवर जॉब कार्ड मॅपिंग जोडण्यासाठी ग्रामसेवक व ग्रामपंचायतीचे डेटा ऑपरेटर यांच्यामागे ही कामे लावण्यात आली. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट आणि लाॅकडाऊनमुळे सध्या शासकीय कामकाज ठप्प पडले आहे. त्यातच आता जॉब कार्ड मॅपिंग करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झाल्याने स्थानिक पातळीवर काम वेगाने सुरू झाले आहे.
तालुक्यात १० हजार १०२ प्रस्तावांची नोंदणी
पाथरी तालुक्यात ४२ ग्रामपंचायतीअंतर्गत ऑनलाईन सर्वेक्षणमध्ये १० हजार १०२ प्रस्ताव नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत ७ हजार ८०६ प्रपत्र ड चे जॉब मॅपिंग पूर्ण करण्यात आले आहे. अद्याप २२९६ प्रपत्र ड चे जॉब मॅपिंग करणे बाकी असल्याने कामात गती यावी, याकरिता येत्या सोमवारपर्यंत जॉब मॅपिंग करण्याची सक्ती गटविकास अधिकारी सुहास कोरेगावे यांनी सर्व ग्रामसेवकांना केली आहे.