पाथरी:जायकवाडी धरण्याच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी तिसऱ्या आवर्तनासाठी सोडण्यात आलेले पाणी परभणी जिल्ह्यात दाखल झाले आहे. १० फेब्रुवारीपासून पिकांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. त्याच बरोबर उन्हाळी हंगामातील पिकांसाठी १ मार्चपासून चार पाणी पाळीचे नियोजन ही जायकवाडी विभागाकडून करण्यात आले आहे.
पैठण येथील जायकवाडी धरण पूर्णक्षमतेने भरल्या नंतर याचा सिंचनासाठी औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होतो. डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातील वरखेड येथून जायकवाडीचे क्षेत्र सुरू होते. पाथरी, मानवत, परभणी भागातील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक लाभ होतो.
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी या प्रमुख पिकांसोबत कापूस आणि ऊस पिकांसाठी या पाण्याचा लाभ मिळतो. यावर्षी रब्बी हंगामातील पिकांसाठी जायकवाडी विभागाने तीन पाणी पाळ्याचे नियोजन केले आहे. यापूर्वी पाहिले रोटेशन २७ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर, दुसरे रोटेशन ८ जानेवारी ते ३० जानेवारी पर्यंत चालेल. आता जायकवाडी विभागाने तिसऱ्या रोटेशनसाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडले आहे. कमी क्षमतेने पाणी जिल्ह्यात दाखल झाले आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पूर्णक्षमतेमे पाणी आल्या नंतर १० फेब्रुवारी पासून सिंचनासाठी पाणी वितरीकेतून थेट शेतकऱ्यांच्या शेतात सोडले जाणार आहे.
६ हजार १०० हेक्टर सिंचन
जायकवाडीच्या डाव्या कलव्यावर रब्बीसाठी ६ हजार १०० हेक्टरवर सिंचन करण्यात आले आहे. जायकवाडीच्या पाण्याने या भागातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी मोठा फायदा झाला आहे.
उन्हाळी हंगामासाठी १ मार्चपासून पाणी सोडण्याचे नियोजन
रब्बी हंगामातील तीन पाणी रोटेशन सोबतच उन्हाळी हंगामातील पिकांना ४ रोटेशन पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १ मार्च पासून उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता डी. बी. खारकर यांनी दिली.