शहरी भागातच रुग्णांवर उपचार
परभणी : कोरोनाच्या अनुषंगाने परभणी शहरासह प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपचाराची सुविधा उपलब्ध असली तरी केवळ परभणी येथेच हे रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. परभणीतील आयटीआय हॉस्पिटल वगळता एकाही शासकीय रुग्णालयात सध्या रुग्ण उपचार घेत नाहीत. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणची शासकीय रुग्णालये कोरोनामुक्त झाली आहेत.
जिल्ह्याच्या किमान तापमानात वाढ
परभणी : दोन दिवसांपासून किमान तापमान घटल्याने जिल्ह्यात थंडी वाढली होती. जिल्ह्याचा पारा १० अंशापेक्षा कमी नोंद झाला होता. मात्र शनिवारी या तापमानात वाढ झाली आहे. १५.७ अंश किमान तापमानाची नोंद झाली असून, वातावरणात पुन्हा उकाडा निर्माण झाला आहे.
टोमॅटो पिकावर अळीचा प्रादुर्भाव
परभणी : जिल्ह्यातील टोमॅटोच्या पिकावर फळ पोखणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळत आहे. या अळीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के ३ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, भाजीपाला पिकामध्ये तण नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.
पूर्णा येथे सांस्कृतिक सभागृहाची मागणी
पूर्णा : शहरातील सम्राट अशोक नगर भागात अशोक सांस्कृतिक सभागृह उभारावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या नगरातील मटन मार्केटची जुनी इमारत नगरपालिकेने जमीनदोस्त केली आहे. ही इमारत पालिकेच्या मालकीची असून, या ठिकाणी सम्राट अशोक सांस्कृतिक सभागृह उभारावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या संदर्भातील प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.