वितरिका क्रमांक ९ ची झाली दुरवस्था
परभणी : तालुक्यातील गोविंदपूरवाडी परिसरात निम्न दुधना प्रकल्पाच्या वितरिका क्रमांक ९ ची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्प प्रशासनाने रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आलेल्या पाण्याचा उपयोग घेता आला नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी याकडे लक्ष देऊन संबंधित गुत्तेदारावर कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.
पुलावरील लोखंडी पाईप चोरीला
परभणी : तालुक्यातील कारला ते कुंभारी रस्त्यावर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामावरील सहा पाईप अज्ञातांनी चोरून नेेले आहेत. त्यामुळे या पुलाचे काम करताना संबंधित कंत्राटदाराला अडचणीचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कोतवालांना दिली भलतीच कामे
परभणी : गावपातळीवरील महसूल विभागाची कामे सुरळीत पार पडावी, यासाठी राज्य शासनाने परभणी तालुक्यात जवळपास ४० कोतवालांची नियुक्ती केली. मात्र, मागील काही दिवसांपासून परभणी तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या कोतवालांना रात्रपाळीच्या कामासह इतर कामे दिली जात आहेत. त्यामुळे कोतवालांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्रेरणा प्रकल्प कागदावरच
परभणी : नापिकी, कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. याच आत्महत्या थांबविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना तणावातून दूर करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रकल्प प्रेरणा विभाग कार्यरत आहे. या ठिकाणी मानसोपचार तज्ज्ञासह समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते अशी पदे भरण्यात आली आहेत. मात्र, या विभागाकडून शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे.
१ मार्चपासून कापूस खरेदी बंद
परभणी : शहरासह इतर ठिकाणी कापूस पणन महासंघाच्या वतीने केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावानुसार मागील तीन ते चार महिन्यांपासून कापूस खरेदी सुरू होती. मात्र, आता कापसाची आवक घटल्याने १ मार्चपासून पणन महासंघाची कापूस खरेदी कायमची बंद करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने एका पत्राद्वारे कळविले आहे.
परभणी येथे शस्त्रक्रिया संथगतीने
परभणी : येथील मुख्य नेत्र रुग्णालयात मागील काही दिवसांपासून शस्त्रक्रिया संथगतीने सुरू आहेत. या प्रकाराबाबत या विभागाच्या अधिकाऱ्यांना ना खंत ना गांभीर्य वाटत असल्याने रुग्णांच्या नातेवाइक़ांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार गेल्या काही महिन्यांपासून ढेपाळला आहे. याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
राजुरा ते कुपटा फाटा रस्त्याची दुरवस्था
परभणी : सेलू तालुक्यातील राजुरा ते कुपटा फाटा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याबाबत राजुरा, आडगाव दराडे येथील ग्रामस्थांनी अनेकवेळा या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे केली आहे. मात्र, या विभागाला अद्यापपर्यंत या दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या तक्रारीकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही.