परभणी जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढतच आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सुटी मिळणे कठीण झाले आहे, तर सतत संचारबंदीत रस्त्यावर कार्यरत राहून गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त कालावधी वाढला आहे. अशा स्थितीत मागील एक ते दीड वर्षापासून हे कर्मचारी आणि अधिकारी कार्य करीत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढला आहे. आरोग्य आणि पोलीस विभागातील मिळून साधारण ५०० कर्मचारी पाॅझिटिव्ह आढळले, तर दोन्ही विभागांत मिळून १० जणांचे मृत्यू झाले आहेत. यामुळे केवळ कर्मचारीच नव्हे, तर त्यांचे कुटुंबसुद्धा भयभीत झाले आहे.
जिल्ह्यातील एकूण पोलीस कर्मचारी - १६९९
जिल्ह्यातील एकूण पोलीस अधिकारी - १३२
जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी - १०००
जिल्ह्यातील डॉक्टर्स - ३५०
कुटुंब आणि नोकरी सांभाळण्याची कसरत
आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मानसिक थकवा घालविणारे कोणतेही शिबिर घेण्यात आले नाही. उलट कामाच्या वेळा मात्र वाढल्या आहेत, तसेच काम महिनाभर आणि एवढे करून पगारात कपात होतेय. - एक आरोग्य कर्मचारी.
आम्ही सुरक्षित राहिलो तर आमचे कुटुंब सुरक्षित राहील. इथे कामाचा ताण सहन करू; पण त्यासाठी निश्चित वेळ ठरविणे गरजेचे आहे. कमी कर्मचारी असताना यंत्रणा राबवीत आहोत. कुटुंब आणि स्वत:साठी वेळ देणे सुद्धा होत नाही. - एक आरोग्य कर्मचारी.
पोलीस कर्मचाऱ्यांसाठी योगासन, प्राणायाम, तसेच मन शांत राहण्यासाठी शिबिर घेणे गरजेचे आहे. दिवस-रात्र कधीही नोकरीत व्यस्त राहावे लागत असल्याने कधी कधी तणाव वाटतो.
- एक पोलीस कर्मचारी.
कामाचा ताण वाढल्याने किमान साप्ताहिक सुटी मिळणे गरजेचे आहे. पोलिसांसाठी किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मानसिक तणावातून मुक्त राहण्यासाठी कुठल्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. - एक पोलीस कर्मचारी.
आरोग्य व पोलिसांवर ताण वाढला आहे; पण रोजच्या वाढत्या रुग्णसंख्येने आधी रुग्ण बरे करण्यासाठी आरोग्य कर्मचारी प्राधान्य देत आहेत. त्यांना मानसिक तणावातून मुक्तता मिळावी, यासाठी शिबिर, समुपदेशन करण्यास वेळच मिळत नाही. कर्मचारी कमी असल्याने हा ताण वाढला आहे. यापुढे मात्र, उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू.
- डाॅ. प्रकाश डाके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.