परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत जिल्ह्यात ३१५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील सर्वाधिक १६९ रुग्णांचा मृत्यू जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला आहे. तर परजिल्ह्यात उपचार घेणाऱ्या परभणी जिल्ह्यातील ४९ रुग्णांवर मृत्यू ओढवला आहे.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यानंतर या आजारावर उपचार घेणाऱ्या अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे मागील वर्ष जिल्हावासीयांना धास्तीत घालवावे लागले. कोरोनामुळे आतापर्यंत ३१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक १६९ रुग्णांचा मृत्यू जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला असून, खासगी रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूची संख्या ६९ एवढी आहे. त्याचप्रमाणे कोरोना संसर्गाच्या काळात अनेक रुग्णांनी जिल्ह्याबाहेर जाऊन उपचार घेतले. त्यातील ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातच सर्वप्रथम उपचाराची सुविधा उपलब्ध केली होती. त्यामुळे या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक होती. परिणामी याच रुग्णालयात मृत्यूची संख्याही वाढली आहे. त्यानंतरच्या कालावधीत हळूहळू कोरोना रुग्णालयांची संख्या वाढविण्यात आली. शहरातील आयटीआय परिसरात कोरोनासाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यात आले. या रुग्णालयातही २४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होता. याच काळात जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढलेली आहे. कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला असून, मागील दोन महिन्यांपासून मृत्यूचे प्रमाणही घटले आहे.