परभणी : कोणताही आजार अंगावर काढू नका, सर्दी, खोकला, ताप यांसारखी लक्षणे दिसून आल्यास दवाखान्यात जा, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या, असे आवाहन लायन्स आधार फाउंडेशनच्या वतीने केले जात आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, ग्रामीण भागातील रुग्ण घरीच उपचार करीत आहेत. दुखणे वाढल्यानंतर दवाखान्यात येऊन उपचार केले जातात. परंतु, तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण भागात जनजागृती करण्याचे काम लायन्स क्लब आणि लायन्स आधार फाउंडेशनने हाती घेतले आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनजागृती केली जात आहे. आतापर्यंत पिंपरी देशमुख, बाभळी, उखळद, वांगी, पेडगाव, ताडबोरगाव आदी भागांत ही जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच यांच्या सहकार्यातून ग्रामस्थांना कोरोनाविषयी माहिती दिली जात आहे. कोणतेही दुखणे अंगावर काढू नका, सर्दी, ताप, खोकला यांसारखी लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वैद्यकीय उपचार घ्यावेत, असा सल्लाही दिला जात आहे. लायन्स क्लबचे प्रवीण धाडवे, शिरीष दलाल, विक्की नारवाणी आदींसह इतर सदस्यांनी गावागावात फिरून जनजागृती सुरू केली आहे.
कोरोनापूर्वी आणि नंतर काय करावे?
कोरोनाचा संसर्ग आपल्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी काय काळजी घ्यावी? याबाबत या अभियानात माहिती दिली जात आहे. त्यात मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. त्याचप्रमाणे कोरोना झाल्यानंतर कशा पद्धतीने उपचार घ्यायचे, याची माहिती दिली जात आहे. कोरोना झाल्यानंतर वेळेत उपचार केल्यास ८५ टक्के रुग्ण बरे होतात. त्यामुळे ग्रामस्थांनी दुखणे अंगावर काढू नये, असे आवाहन या अभियानादरम्यान केले जात आहे.