परभणी : किरकोळ वादाच्या कारणावरून एका १९ वर्षीय तरुणास पोलिसांत तक्रार दिल्यास खतम करून टाकतो, अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार ९ मे रोजी घडला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेलू येथील गायत्री नगर भागातील रहिवासी विशाल अशोक धोत्रे (१९) याचा ५ मे रोजी त्याच्या गल्लीत राहणाऱ्या भाऊसाहेब हजारे (२३) याच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर ९ मे रोजी दुपारी २ वाजता भाऊसाहेब हजारे याने विशालकडे येऊन, तू माझ्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात का गेला होतास, असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी विशालने आरडाओरडा केल्यानंतर इतर नागरिक जमा झाले. त्यांनी सोडवासोडव केली. त्यांतर भाऊसाहेब हजारे याने, पोलिसांत तक्रार दिलीस तर तुला खतम करून टाकतो, अशी विशाल धोत्रे याला धमकी दिली. त्यानंतर विशाल धोत्रे याने सेलू पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यावरून आरोपी भाऊसाहेब हजारे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.