परभणी : सहा महिन्यांपासून दुष्काळाच्या संकटात अडकलेल्या शेतकर्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिला. शनिवारी रात्रीपासून होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील उरलीसुरली पिकेही भुईसपाट झाली आहेत. जिल्ह्यात शनिवारपासूनच अवकाळी पावसाला प्रारंभ झाला. रविवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. पावसाची रिपरिपही रात्री उशिरापर्यंत सुरु होती. पावसाळ्यातील संततधार पावसाप्रमाणे दिवसभर झालेल्या या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. जायकवाडीच्या पाण्यावर काही शेतकर्यांनी रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा ही पिके घेतली होती. ऐन काढणीच्या अवस्थेतच असताना पुन्हा एकदा निसर्गाने दगा दिला. ज्वारी, गहू ही दोन्ही पिके काढणीला आली होती. त्याबरोबरच अंब्याला मोहोर लागला होता. हा मोहोरही पावसाने झडून गेला. पाले-भाज्या आणि फळ पिकांचेही या पावसाने नुकसान केले आहे. रात्री १0 वाजेपर्यंत ही रिपरिप सुरु होती. बोरी परिसरातही २८फेब्रुवारी व १मार्च रोजी झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. /(प्रतिनिधी)
पालम- यंदा पालम तालुक्यात रबी हंगामात ५ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. अवकाळी पावसाने पिकांना फटका बसल्याचे दिसून येत आहे. पालम तालुक्यात यावर्षी दोन्ही हंगामातील पिकांनी शेतकर्यांची साथ सोडली. ज्वारी ३ हजार ५९ हेक्टर, गहू ९८८ हेक्टर, मका २0६ हेक्टर तर हरभरा १हजार ३00 हेक्टरवर शेतकर्यांनी पेरणी केली होती. जीवाचे रान करुन शेतकर्यांनी लावलेल्या या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले.
दुष्काळात तेरावा महिना> गंगाखेड- अवकाळी पावसामुळे शेतकर्यांसमोर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा २३ टक्के क्षेत्रफळावर रबी हंगामात पेरणी झाली होती. पावसामुळे या पिकांना धोका निर्माण झाला आहे.रविवारी पहाटेपासून तालुक्यात सर्वच भागात दिवसभर पाऊस झाला. ज्वारीच्या कणसाला दाणे भरण्याची प्रक्रिया सुरु असल्याने या पावसाने ज्वारी काळी पडून कडब्याची प्रतवारी बिघडणार आहे. तर गव्हाचा रंगही बदलणार आहे. आंब्याचा मोहोर गळून पडल्याने उत्पादनावर घट होणार आहे.
गहू- हरभर्याचे नुकसान> जिंतूर- चोवीस तासापासून जिंतूर शहरासह तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी व हरभरा या पिकांचे नुकसान झाले. २८फेब्रुवारी रोजी जोरदार वार्यासह पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने काढणीला आलेली पिके आडवी झाली. नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पिकांचे पंचनामे प्रशासनाने करावेत, अशी मागणी तालुक्यातील शेतकर्यांतून होत आहे.
आंब्याचे नुकसान> पूर्णा-तालुक्यात शनिवार सायंकाळपासून पावसास सुरुवात झाली. १मार्च रोजी सायंकाळपर्यंत रिमझिम पाऊस झाला. या पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. एरंडेश्वर, चुडावा, गौर, ताडकळस व परिसरात रिमझिम तर काही भागात जोराचा पाऊस झाला. पावसामुळे आमराईला आलेला फुलोरा गळून पडला. उन्हाळ्याच्या तोंडावर नागरिकांना थंडीचा अनुभव पावसामुळे आला.
रबी पिकांचे नुकसान> सेलू- दोन दिवसांपासून तालुक्यात सुरु असलेल्या बेमोसमी पावसामुळे रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे दुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांची चिंता अजूनच वाढली आहे.शनिवारपासून सेलू व परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. रविवारी दिवसभर रिमझिम पाऊस झाल्याने रबी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू या पिकांचे नुकसान झाले. तालुक्यात ३१हजार ६४0क्षेत्रावरच रब्बी पिकांची लागवड करण्यात आली. यामध्ये २४ हजार ३५३ हेक्टरवर ज्वारीची लागवड आहे. या पावसाने ज्वारी काळी पडणार आहे. तर आंब्याला आलेला मोहोर गळण्याची शक्यता वाढली आहे.
ज्वारी झाली आडवी
>पाथरी- तालुक्यात मागील २४ तासात झालेल्या अवकाळी पावसाने गहू, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले. काही भागात ज्वारी आडवी पडल्याचे दिसून आले. सध्या रबी हंगामातील गहू, ज्वारी पिकाची काढणी सुरु आहे. अनेक ठिकाणी ज्वारी कापून बांधणी केली जात आहे. यातच २८फेब्रुवारी रोजी सायंकाळी अचानक पावसास सुरुवात झाली. १ मार्च रोजी सकाळपासून तालुक्यात रिमझिम पाऊस सुरु झाला. तालुक्यातील उमरा, गुंज, अंधापुरी, गौंडगाव या भागात उभी ज्वारी आडवी पडली. या पावसाचा फायदा कमी तर नुकसान जास्त, अशी स्थिती शेतकर्यांसमोर निर्माण झाली आहे.