परभणी शहरात १६ प्रभाग आहेत, तर जवळपास ७४ हजार मालमत्तांची नोंद आहे. यामध्ये जुन्या पाईपलाईनवरील २४ हजार नळ जोडणी आहेत, तर नव्याने १८ हजार ५०० नळ जोडणी झाल्या आहेत. मागील एक वर्षापासून मनपा प्रशासन नवीन नळ जोडणी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी मनपाने शहरात नवीन जलकूुभ उभारले. शहरात अंतर्गत भागात नवीन पाईपलाईन अंथरली, जलशुद्धिकरण केंद्र सुरू केले; पण हे पाणी नवीन पाईपलाईनद्वारे सोडण्यासाठी संपूर्ण प्रभागातील नळ जोडण्या नवीन होणे गरजेचे आहे. मात्र, नागरिक पूर्वीचा थकबाकी असलेला कर भरत नसल्याने या नळ जोडणीच्या मोहिमेला गती मिळेनासी झाली आहे.
शहरातील एकूण जलकुंभ - १५
शहरात अंथरलेली नवीन पाईपलाईन - ४५० किलोमीटर
शहरातील जुने नळ कनेक्शन - २७ हजार
जलशुद्धिकरण केंद्र कार्यान्वित
तर पाच दिवसाला होईल पाणीपुरवठा
शहरातील प्रभाग क्रमांक १, २, १०, ११, १२, १३, १५, १६ या आठ प्रभागात जुन्या पाईपलाईनवरील पाणी वितरण बंद केले आहे. संपूर्ण आठ प्रभागात नवीन पाईपलाईनद्वारे पाणी वितरण सुरू आहे, तर उर्वरित प्रभाग ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १४ येथे पाईपलाईन अंथरूण तयार आहे. मात्र, नळ जोडणी येथे अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे. येथे नवीन पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा सुरू झाल्यास शहरात सर्वच भागांना पाच दिवसाला पाणीपुरवठा होऊ शकतो.
थकबाकीमुळे मिळेना योजनेला गती
शहरातील अनेक मालमत्ताधारकांकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीचा चालू वर्षांपर्यंतचा भरणा केल्यानंतर नळ जोडणी घेता येणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत शास्ती माफ योजनेला कसा प्रतिसाद मिळतो, यावर नवीन नळ जोडणीची गती अवलंबून आहे.
काही प्रभागात उशिराने होतोय पुरवठा
सध्या शहरातील काही भागांमध्ये जुन्या पाईपलाईन बंद करून त्या नवीन पाईपलाईनला जोडण्याचे काम सुरू असल्याने काही प्रभागात उशिराने पाणीपुरवठा होत आहे, तर काही भागात पाणी सोडल्यानंतर त्याची बंद करण्याची वेळ निश्चित नसल्याने चार ते पाच तास सोडलेले पाणी वाया जात आहे.