दादऱ्याचे काम गतीने करण्याची मागणी
परभणी : शहरातील रेल्वेस्थानकावरील अधिक रुंदीच्या दादऱ्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. येथील रेल्वेस्थानकावरील जुना दादरा कमी रुंदीचा असून, प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे नवीन दादऱ्याला मंजुरी मिळाली. मात्र, मागील एक वर्षापासून हे काम पूर्ण झाले नाही. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन दादऱ्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
खड्ड्यांमुळे वाढली शहरात धूळ
परभणी : शहरात सध्या मोठ्या प्रमाणात धूळ झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे धुळीचे प्रमाण वाढले असून, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मनपा प्रशासनाने काही भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजविले आहेत. मात्र, काही भागातील खड्डे कायम आहेत. त्याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. शिवाय या खड्ड्यांमुळे शहरात धूळही वाढली आहे.
रस्ता वाहतुकीसाठी खुला
परभणी : येथील सुपर मार्केट भागात जलकुंभाला मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू केल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मनपा प्रशासनाने सुपर मार्केट भागातील काम पूर्ण केले असून, रविवारी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. त्यामुळे वाहनधारकांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.
निधीअभावी जिल्ह्यात विकासकामे ठप्पच
परभणी : जिल्ह्यात अजूनही विकास निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे कामे ठप्प आहेत. अतिवृष्टीने जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. हे रस्ते उखडून गेले आहेत. मात्र, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे कामे ठप्प आहेत. अशीच परिस्थिती परभणी शहरातील रस्त्यांची आहे. या कामांसाठीही मनपाला निधी नसल्याने कामे ठप्प आहेत.
वाळूअभावी घरकुलांची कामे रखडली
परभणी : जिल्ह्यातील घरकुलांची कामे वाळूअभावी रखडली आहेत. घरकुल लाभार्थींना वाळू उपलब्ध करून देण्यास जिल्हा प्रशासनाने उदासीनता दाखविली आहे. खुल्या बाजारपेठेत वाळूचे भाव गगनाला भिडले असून, महागामोलाची वाळू खरेदी करून घरकुल बांधणे शक्य नसल्याने अनेक लाभार्थींनी बांधकामे बंद ठेवली आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.