नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिला आणि स्थानकावर येणाऱ्या प्रवासी महिलांना त्यांच्या बाळांना योग्य प्रमाणात स्तनपान करता यावे, यासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक बसस्थानकावर हिरकणी कक्षाची स्थापना केली. या योजनेंतर्गत हिरकणी कक्षाचा वापर होतो का आणि कक्षाची अवस्था कशी आहे, याची पाहणी ‘लोकमत’ने रविवारी केली. सेलू येथील बसस्थानकात भेट दिली असता, या ठिकाणी हिरकणी कक्षच उपलब्ध नसल्याचे पाहावयास मिळाले. विशेष म्हणजे याच पाहणीदरम्यान एक महिला प्रवासी एका भिंतीचा आडोसा घेऊन बाळाला स्तनपान करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे हिरकणी कक्ष नसल्याने मातांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून ही स्थिती असताना एसटी महामंडळाने मात्र या बाबत गांभीर्याने घेतले नाही. परिणामी मातांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एका उदात्त हेतूने सुरू केलेली ही योजना सध्याच्या स्थितीला मात्र अडगळीत पडल्याचे दिसत आहे.
महिलाही योजनेविषयी अनभिज्ञ
प्रत्येक बसस्थानकावर महिलांसाठी हिरकणी कक्ष स्थापन केलेला आहे. या विषयीची माहिती बहुतांश महिलांना नसल्याचे सेलू बसस्थानकावर केलेल्या चर्चेत दिसून आले. त्यामुळे हा कक्ष सुरू करावा, बंद असेल तर त्याचे कुलूप उघडावे या विषयी कुठेही आवाज उठविला जात नाही किंवा तक्रारीही होत नाहीत. महिला या योजनेबद्दल अनभिज्ञ आहेत.
अल्पकाळापुरताच सुरू राहिला हिरकणी कक्ष
सेलू येथील बसस्थानकाची उभारणी ४ वर्षांपूर्वी झाली आहे. नवीन बसस्थानक सुरू झाले तेव्हा सुरुवातीचे काही महिने हा कक्ष या ठिकाणी कार्यरत होता; मात्र त्यानंतर हिरकणी कक्षाचा फलक काढून घेण्यात आला आहे. त्या जागेचा वापर अन्य कारणांसाठी केला जात असल्याचे दिसून आले.
सेलू बसस्थानकात मागील काही वर्षांपासून हा कक्ष उपलब्ध नाही. या ठिकाणी हिरकणी कक्ष सुरू करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून होत असतो. सध्या चौकशी कक्ष, पोलीस मदत केंद्र कार्यरत आहे. या कक्षांचे काम सुरळीत चालते. मात्र हिरकणी कक्ष स्थानकावर कार्यरत नाही. या संदर्भात वरिष्ठांशी संपर्क साधावा.
- डी.के. मुसळे, वाहतूक नियंत्रक, सेलू