मागील वर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. मात्र दुसरीकडे अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसानही झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व भिस्त रबी हंगामावर आहे. जायकवाडी, निम्न दुधना या दोन प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांनी बागायती पिकांना पसंती दिली. त्यातूनच गहू, हरभरा आणि उसाचे क्षेत्र जिल्ह्यात वाढले आहे. या पिकांना पाण्याची सातत्याने आवश्यकता भासते. जायकवाडी प्रकल्पातून आतापर्यंत पाण्याचे दोन आवर्तन जिल्ह्याला मिळाले आहे. दुसरे आवर्तन संपून ८ ते१० दिवसांचा कालावधी लोटला आहे. आता पुन्हा पिकांना पाण्याची गरज भासू लागल्याने तिसरे आवर्तन सुरू करण्याची मागणी होत आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. त्यामुळे तिसरे पाणी आवर्तन दिल्यास या भागातील पिकांना फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे रब्बीचे उत्पादन वाढीसाठी मदत होऊ शकते. तेव्हा जायकवाडी प्रकल्पातून आवर्तन द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
जायकवाडी कालव्याला पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST