कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने व ग्रामीण भागातील रुग्ण परभणी शहरात मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत असल्याने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एकीकडे कोारोनाबाधित रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवरच उपचार मिळतील असे वाटत असताना दुसरीकडे कोविडव्यतिरिक्त इतर रुग्णांचे काय होणार, असाही प्रश्न पडला होता. यासंदर्भात आता राज्याच्या आरोग्य विभागानेच स्पष्टता आणली आहे. या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी काढलेल्या पत्रात कोविड आजाराच्या उपचाराचे नियोजन करताना इतर आजाराचे रुग्ण, गरोदर माता व बालकांच्या सेवा, क्षयरोग, कुष्ठरोग, असंसर्गिक आजार आदींसाठी असणाऱ्या सेवा थांबविता येणार नाहीत. त्यासाठी कोविड वगळता इतर सेवा देण्यासाठी उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालये निश्चित करावीत. या संस्थांचा कोविडसाठी वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यात सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असले तरी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार नाहीत. कोविड सेंटर उभारण्यासाठी स्वतंत्र इमारत असणे आवश्यक आहे. परिणामी जिल्ह्यातील ३७ पैकी फक्त ५ प्राथमिक आरोग्य केंद्रानाच स्वतंत्र इमारत आहे. त्यामध्ये वालूर, पिंगळी, कौसडी, राणीसावरगाव व झरी येथील केंद्रांचा समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणी जि.प.ने कोविड केअर सेंटर उभारले आहे. उर्वरित ठिकाणी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची इच्छा असूनही स्वतंत्र इमारत नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कोविड केअर सेंटर उभारता येणार नाही.
मनुष्यबळ मिळणे कठीणच
कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी लागणारे कर्मचारी, तज्ज्ञ डॉक्टर सद्य:स्थितीत उपलब्ध होणे जि. प. ला कठीण आहे. शिवाय यासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीचाही प्रश्न आहे. त्यामुळे या सर्व बाबी उपलब्ध करून कोविड केअर सेंटर सुरू करणे जिल्हा परिषदेसाठी कठीणच आहे.