वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतमालाच्या नुकसानीसह जीवितहानीदेखील होत आहे. मागील आठवड्यात २५ एप्रिल रोजी जिल्ह्यात वीज पडून दोन मेंढपाळांसह एक शेतकरी अशा तिघांचा मृत्यू झाला होता. तसेच चार बैल दगावले होते. आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले होते.
आता पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण मौसम सेवा विभागाच्या अंदाजानुसार ७ व ८ मे रोजी मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या काळात ताशी ३० ते ४० किमी या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ९ मे रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. १० मे रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड व बीड जिल्ह्यातील पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तेव्हा या काळात नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, झाडाच्या आडोशाला उभे राहू नये तसेच पशुधनास निवाऱ्याच्या जागी बांधावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवेने केले आहे.