परभणी : जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असून दोन्ही वर्षातील उन्हाळ्यात एकाही व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झालेला नाही. कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाल्याची भावना निर्माण होत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मागील वर्षीपासून लॉकडाऊन केले जात आहे. मागील वर्षी २३ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. तसेच यावर्षीही उन्हाळ्यातच संचारबंदी लागू केल्याने नागरिक घरातच बसून आहेत. जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात ४५ अंशापर्यंत तापमानात वाढ होते. वाढलेल्या तापमानामुळे ऊन लागून मृत्यू होण्याचे प्रकार घडतात. मात्र मागील वर्षीपासून तापमानात वाढ होत असली तरी नागरिक घराबाहेर पडले नाहीत. उन्हाळ्याच्या काळातही जास्तीत जास्त नागरिक घरातच राहिले. तसेच इतर व्यवहार ठप्प असल्याने उष्माघाताने होणारे मृत्यू घटले आहेत. यावर्षी देखील उन्हाळ्यामध्ये संचारबंदी लागू असून बाजारपेठ तसेच इतर व्यवहार बंद आहेत. परिणामी नागरिक घरातच बसून असल्याने उष्माघाताचे प्रमाण कमी झाले आहे.
आरोग्य विभागाकडून जनजागृती
उन्हापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतात, याविषयी आरोग्य विभागाकडून दरवर्षी जनजागृती केली जाते. उन्हाळ्यात कोणत्या कपड्यांचा वापर करावा, उन्हापासून बचाव करण्यासाठी काय करावे, याविषयीची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने दिली जाते. ग्रामीण भागात आशा सेविका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते.
उन्हाळा घरातच
संचारबंदीमुळे जिल्ह्याअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील खासगी वाहतूक बंद आहे. याशिवाय इतर व्यवहारही बंद ठेवण्यात आल्याने नागरिक घरात बसून आहेत. परिणामी उन्हाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला नाही. त्यामुळे या वर्षीच्या उन्हाळ्यातही उष्माघाताचे मृत्यू शून्यावर येऊन ठेपले आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी जनजागृती केली जाते. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे, याची माहिती ग्रामस्थांना दिली जाते. मागील दोन वर्षांपासून उष्माघाताचे प्रमाण घटले आहे.
डॉ. शंकरराव देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी