विजेअभावी सिंचनाला बसणार फटका
परभणी : उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार कृषी पंपधारकांना स्वतंत्र विद्युत रोहित्र त्यांच्या जलस्रोताजवळ उभारून देण्यात येत आहे. त्यामुळे कृषी पंपधारकांना येणाऱ्या वीज समस्यांपासून सुटका मिळणार होती; परंतु या योजनेतील बहुतांश कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे विजेअभावी शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी उपलब्ध असूनही सिंचन क्षेत्राला मोठा फटका बसत आहे.
वाळूअभावी घरकुलांची बांधकामे रखडली
परभणी : जिल्ह्यात वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने, खुल्या बाजारपेठेत वाळू उपलब्ध नाही. परिणामी, चढ्या दराने वाळू खरेदी करावी लागत आहे. शासनाच्या विविध योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानात घरकुल बांधकाम करणे शक्य नसल्याने, लाभार्थ्यांनी घरकुलांची बांधकामे बंद ठेवली आहेत. प्रशासनाने लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
गहू, हरभऱ्याचे
पीक बहरात
परभणी : जिल्ह्यात यावर्षी गहू आणि हरभऱ्याचे पीक बहरात आहे. जायकवाडी आणि निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन मिळाल्याने, या पिकाला वेळेवर पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे दोन्ही पिकांची वाढ सध्या समाधानकारक आहे. यंदाच्या रब्बी हंगामात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने रब्बीचे उत्पादन वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात गुटख्याची विक्री सुरूच
परभणी : जिल्ह्यात गुटख्याची विक्री सर्रास सुरू झाली आहे. मध्यंतरी पोलीस प्रशासनाने गुटखा विक्रीविरुद्ध मोहीम सुरू केल्यानंतर, या विक्रीला काही प्रमाणात आळा बसला होता; मात्र आता परत खुलेआम गुटख्याची विक्री केली जात आहे. राज्यात गुटखा विक्रीला बंदी असताना, या नियमांचे कुठेही पालन होत नाही. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी याविरुद्ध मोहीम सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.