गंगाखेड शहरातील जायकवाडीच्या शासकीय जागेत गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून राहत आसलेल्या गौतमनगरातील नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी जायकवाडी विभागाने नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, नगर परिषद प्रशासनाने अतिक्रमणधारकांना मालकी हक्काचे कबाले द्यावे आदी मागण्यांसाठी जनशक्ती कृती समितीचे अध्यक्ष प्रमोद मस्के यांच्या नेतृत्वाखाली गौतमनगर परिसरातील झोपडपट्टीधारकांनी २५ जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला तरी नगर परिषद किंवा महसूल प्रशासनाने याची दखल घेतली नाही. २७ जानेवारी रोजी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनूस, बाळासाहेब जंगले, मुस्तफा शेख आदींनी मध्यस्थी करत नगर परिषद प्रशासनाकडे उपोषणार्थींची बाजू मांडली. त्यानंतर नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे यांनी याप्रकरणी तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्यासह वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले. अतिक्रमण झालेल्या जमीन मोजणीची फी कार्यालयीन कामकाजाच्या आठ दिवसांत भरून पुढील कार्यवाही सर्वांसाठी घरे २०२२ ही योजना संपुष्टात येण्याआधी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी अतिक्रमणधारकांच्या उपोषणाची सांगता करण्यात आली.
अतिक्रमणधारकांच्या उपोषणाची तिसऱ्या दिवशी सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST