कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. याच काळात नागरिकांना किराणा व भाजीपाला साहित्य खरेदी करता यावे, यासाठी १ ते ४ मे या कालावधीमध्ये किराणा, भाजीपाला दुकान सुरू ठेवण्यास सूट दिली होती. मात्र, परवानगी नसलेल्या अनेक दुकानांमध्येही व्यवसाय होत असल्याची बाब मंगळवारी निदर्शनास आली. उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश कुमार, नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, विनायक बनसोडे, भीमराव लहाने, प्रकाश काकडे यांच्यासह पथकाने मंगळवारी शहरातील कच्छी बाजार, जनता मार्केट, शिवाजी चौक या भागात फिरून बंद शटरआड व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच यापुढे नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा नोंद करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. सकाळी १० वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत केलेल्या कारवाईत १३ दुकानदारांकडून ५४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच याच काळात बाजारपेठ भागात विनामास्क फिरणाऱ्या ३७ नागरिकांकडून ७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दोन्ही कारवाईत मिळून ६१ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल झाल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली.
बंद दुकानाआड व्यवसाय; तेराजणांकडून वसूल केला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:28 IST