मनपाच्या वतीने शहरातील १६ वॉर्डमध्ये असलेल्या गावठाण भागाकरिता व जेथे नळयोजना कार्यान्वित नाही अशा ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर, हातपंप, बोअरवेल व अन्य पर्यायांचा अवलंब करण्याची वेळ येत होती. परंतु, मागील वर्षी मार्चपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संसर्गाने तसेच मनपाने शहरात केलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाने बहुतांश भाग टँकरमुक्त झाले आहेत. यामुळे या बाबींवर दरवर्षी खर्च होणारा लाखोंचा खर्च वाचला आहे.
असा होतो खर्च
दरवर्षी महापालिका स्वतःचे सात आणि निविदा काढून २८ ते ३० असे ३५ टँकर लावते. यामुळे यावर साधारणतः ८० लाख ते एक कोटी एवढा खर्च दरवर्षी होतो. या खर्चाची मागील दोन वर्षांत २०१९-२० व २०२०-२१ या काळात बचत झाली आहे.
काही भागातील समस्या कायम
काही भागात दहा ते बारा दिवसाला पाणी येत आहे तर कुठे पाइपलाइन नाही तसेच कामे अर्धवट राहिली आहेत. प्रभाग ६, ७, ८, ९ यातील काही ठिकाणी पाइपलाइन नाही. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. पाणी लिकेजचे प्रमाण वाढले आहे. मागील तीन दिवसांत प्रभाग २ मधील मदिना पाटी, प्रभात ७ मधील साने चौक व वसमत रस्त्यावरील राजगोपालचारी उद्यान परिसरातील पाइपलाइन फुटल्याचा प्रकार घडला होता. यामुळे एकीकडे टंचाईचा निधी वाचत असला तरी उर्वरित कामांसाठी किरकोळ खर्च करण्याची वेळ येत आहे.