यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे इफ्कोने खताच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. गतवर्षी १२०० रु. ला मिळणारे डीएपीचे पोते १७५० ते १९०० रु. ला झाले आहे. तर १०-२६-२६ ची एका पोत्याची किंमत ११७५ वरुन १७७५ रु. झाली आहे. ही दरवाढ तत्काळ रद्द करावी. या दरवाढीचा फायदा घेऊन अनेक खत- बियाणे विक्रेते जुना शिल्लक खत नवीन दरात विकून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. यासाठी ते कच्च्या पावत्यांचा वापर करत आहेत. अनेक दुकानदारांकडे ई-पॉश मशीनवरील खतसाठा व प्रत्यक्षात खतसाठा यामध्ये तफावत आहे. तसेच दुकानदारांकडे ई-पॉशवर शेतकऱ्यांचे चुकीचे मोबाईल नंबर टाकले जात आहेत. यावर कृषी विभागाने नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक दुकानदाराकडे जुन्या खताचा साठा शिल्लक आहे, याची माहिती कृषी विभागाने प्रसिद्ध करून त्याची माहिती दुकानदाराला जुन्या दरासह दर्शनी भागावर लावणे बंधनकारक करावे तसेच पथके नेमून दररोज प्रत्येक दुकानाची तपासणी करावी, अन्यथा मनसे शेतकरी सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर प्रदेश उपाध्यक्ष बालाजी मुंडे, मनसे जिल्हाध्यक्ष शेख राज, गणेश सुरवसे, शहराध्यक्ष सचिन पाटील, राहुल कनकदंडे, तात्या रंगे आदींची नावे आहेत.
जिल्ह्यात खत, बियाणांचा काळाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:17 IST