परभणी : शेतीच्या वादातून मारहाण केल्याची घटना २ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन्ही गटांकडून दिलेल्या तक्रारीवरून १० जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
येथील लंगोट गल्ली भागातील सुधाकर बाबूराव लंगोटे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अशोक पंडितराव शेरकर, साहेब पंडितराव शेरकर, भगवान पंडितराव शेरकर, नितीन साहेबराव शेरकर, संताबाई पंडितराव शेरकर यांनी २ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शिवीगाळ करून मारहाण केली. शेत सर्व्हे नं. २७० मधील शेतीचा वाद न्यायालयात सुरू असताना सकाळी शेतात का गेलास, अशी विचारणा करून शिवीगाळ करण्यात आली, तसेच कोयत्याने हात-पाय तोडण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
दुसऱ्या बाजूने शालिनी अशोक शेरकर यांनीही तक्रार नोंदविली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार भास्कर दत्तराव लंगोटे, बालासाहेब दत्तराव लंगोटे, व्यंकट दत्तराव लंगोटे, सुधाकर बाबूराव लंगोटे, रंगनाथ दत्तराव लंगोटे यांनी शेत सर्व्हे नं. २७० मधील शेतीच्या जुन्या वादातून पतीला शिवीगाळ केली. त्यामुळे जाऊ गोदावरी, सासू संताबाई आणि दीर आम्ही सर्व बाहेर आलो असता, आम्हालाही विटा व काठ्याने मारहाण करून जखमी केले. या तक्रारीवरून वरील पाच आरोपींविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक कुंदकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. आर.एस. पाटील, नारायण आघाव, केशव लटपटे, भगीरथ गवळी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.