परभणी : पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील लता पांचाळ या दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या युवतीने महाराष्ट्रातील सर्वांत उंच व चढाईला अतिशय कठीण मानले जाणारे कळसूबाई शिखर सर करीत आदर्श प्रस्थापित केला आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला तिने ही कामगिरी केली.
शिवार्जुन प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिव्यांग युवक-युवतींसाठी कळसूबाई शिखर सर करण्याची मोहीम आखली जाते. यावर्षी राज्यातील २० जिल्ह्यांतील ७० दिव्यांग युवकांना घेऊन ३० डिसेंबर रोजी मध्यरात्री सह्याद्री डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जाहिंगीरदारवाडी गावात सर्व जण एकत्र आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मोहिमेला प्रारंभ झाला. या मोहिमेत लता पांचाळ हीदेखील आपल्या मैत्रिणींच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेत सहभागी झाली. यावेळी कोणताही नकारात्मक विचार तिच्या मनाला शिवला नाही. ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, कळसूबाई माता की जय, हर हर महादेव’ अशा घोषणा देत इतर दिव्यांगांसोबत लताने शिखर चढाईसाठी कूच केली. एकमेकांना आधार देत व मनोबल वाढवत दिव्यांग युवक शिखर सर करण्यास निघाले. कळसूबाई शिखर सर करताना शेवटी येणाऱ्या चार लोखंडी शिड्या लताने मोठ्या जिद्दीने पार केल्या व नववर्षाच्या पूर्वसंध्येला तिने हे शिखर सर केले. नववर्षाच्या पहाटे सह्याद्री पर्वताच्या माथ्यावर असलेल्या कळसूबाई मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर सकाळी १० वाजता परतीचा प्रवास सुरू केला. शिखरावरून खाली उतरताना वाट निसरडी असल्याने काळजीपूर्वक पावले टाकावी लागत होती.
आत्मविश्वास उंचावला
लता पांचाळ हिने २०१८ मध्ये पुण्यात इतर मैत्रिणींकडून ट्रेकिंगबद्दल अनेक वेळा ऐकल्याने याविषयी उत्सुकता होती. इतर मुली ट्रेकिंग करू शकतात. मग आपण का करू शकत नाही? या जिद्दीने तिने दोन वर्षांपूर्वी प्रतापगड सर केला. लहानपणापासून नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे. नवीन वर्षानिमित्त अंध मुला-मुलींसाठी आयोजित केलेल्या कळसूबाई शिखर मोहिमेत सहभागी होण्याचा निर्धार केला आणि हे शिखर सर केल्याने आत्मविश्वास दुणावला, असे लता पांचाळ यांनी सांगितले.