दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील नांदेड विभागातील परभणी हे महत्त्वाचे स्थानक आहे. येथून दक्षिण भागासह उत्तरेकडे आणि मुंबईसह अन्य महत्त्वाच्या ठिकाणी जाण्याची सोय उपलब्ध आहे. परभणी स्थानकावरुन सध्या १६ दररोज तर ९ साप्ताहिक अशा मिळून एकूण २५ रेल्वे धावत आहेत. यामध्ये नांदेड-मुंबई, नांदेड-दिल्ली, आदिलाबाद-मुंबई, मनमाड-सिकंदराबाद, परभणी-नांदेड, कोल्हापूर-धनबाद, नागपूर-कोल्हापूर, नांदेड-औरंगाबाद, रेणिगुंटा-औरंगाबाद, विजयवाडा-शिर्डी, तिरुपती-शिर्डी, नांदेड-बेंगलोर, औरंगाबाद-हैदराबाद, मनमाड-धर्माबाद, तांडूर-परभणी यासह अन्य रेल्वे धावतात. कोरोनापूर्वी सुरु असलेल्या सर्वसाधारण पॅसेंजर रेल्वे सध्या एक वर्षांपासून बंद आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे. तर कोणताही प्रवास करण्यासाठी आरक्षण अनिवार्य असल्याने प्रवासी संख्या रोडावली आहे.
प्रवाशांची गर्दी अद्याप नाही
देशभरात कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर रेल्वे सेवा सुरु झाली. तेव्हा परभणी स्थानकावरुन पहिल्या टप्प्यात नांदेड-दिल्ली ही सचखंड रेल्वे सुरु झाली होती. हळूहळू यासोबत मुंबई आणि इतर विशेष रेल्वे सुरु करण्यात आल्या. सध्या २५ रेल्वे सुरु आहेत. मात्र, पाहिजे तसा प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. अगदी बोटावर मोजण्या इतक्या प्रवासी संख्येवर रेल्वेची ये-जा येथून सुरु आहे.
मुंबई-दिल्ली जाणे अनेकांनी टाळले
येथून मुंबई जाण्यासाठी दररोज तीन तर दिल्ली जाण्यासाठी एक रेल्वे दररोज आहे. मात्र, तेथे वाढणारे कोरोना रुग्ण आणि शासनाने रेल्वे प्रवासाला घालून दिलेले निर्बंध पाहता या दोन्ही शहरात परभणीकरांनी जाणे टाळले आहे.
आम्ही परभणी स्थानकावर केंद्र शासन व राज्य शासनाचे नियम प्रवाशांना वेळोवेळी उद्घोषणा तसेच माहितीपत्रक लावून सांगत आहोत. म्हणावा तसा प्रवाशांचा प्रतिसाद अद्याप मिळाला नाही. - देविदास भिसे, स्टेशन प्रबंधक, परभणी रेल्वे स्थानक.
अशी आहे आकडेवारी
१९ एप्रिल
आरक्षण - ३०७ तिकिटे, ४६५ प्रवासी संख्या
रद्द आरक्षण - ३१ तिकिटे
२० एप्रिल - २२७ तिकिटे, ३६७ प्रवासी संख्या
रद्द आरक्षण - २२ तिकिटे
पनवेल रेल्वे रद्दचा फटका
दररोज पुणे मार्गे पनवेल जाणारी रेल्वे ३१ मे पर्यंत सध्या रद्द करण्यात आली आहे. त्याचा फटका काही प्रमाणात आरक्षणाला बसत आहे.