निराधारांना मंजूर अनुदान देण्याची मागणी
गंगाखेड : श्रावणबाळ, संजय गांधी, इंदिरा गांधी, वृद्धापकाळ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान वाटप करावे, अशी मागणी होत आहे. तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम मंजूर झाली असली तरी लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यास विलंब लावला जात आहे. तेव्हा तातडीने अनुदान वितरित करावे, अशी मागणी पं.स. उपसभापती शांताबाई माने यांनी केली आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा वावर
गंगाखेड : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला आहे. प्लाॅट, शेत, गहाणखत, बक्षीसखत, हक्कसोड प्रमाणपत्र आदी कामांच्या दस्तनोंदणीची कामे या कार्यालयात होतात. दलालांकडून आलेली कामेच लवकर केली जात आहेत. त्यामुळे दलालांशिवाय काम होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
आच्छादनाचा शेतात वापर वाढला
गंगाखेड : टरबूज, खरबूज लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर तालुक्यात वाढला आहे. पिकांना कमी पाणी लागावे. कीड आणि रोगांपासून त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी मल्चिंग पेपर वापरण्याचे प्रमाण वाढले आहे.
आठ उमेदवार न्यायालयात दाद मागणार
गंगाखेड : गंगाखेड तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायतीतील ८ जणांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे अर्ज बाद झालेले आठही उमेदवार न्यायालयात दाद मागणार आहेत.
पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांची दांडी
गंगाखेड : येथील पंचायत समितीत विविध कामांसाठी ग्रामीण भागातून नागरिक येत आहेत. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीमुळे पं.स.तील अधिकारी जागेवर अनुपस्थित राहत नसल्याने नागरिकांना त्यांच्या कामासाठी चकरा माराव्या लागत आहेत.
घोणस जातीच्या सापाला जीवदान
गंगाखेड : येथील औद्योगिक परिसरात आढळलेल्या घोणस जातीच्या सापाला सर्पमित्र चेतन लांडे यांनी जीवदान दिले आहे. औद्योगिक परिसरात साप असल्याची माहिती ग्रामस्थांनी लांडे यांना दिली होती. या माहितीनंतर चेतन लांडे यांनी तातडीने औद्योगिक परिसरात दाखल होऊन या सापाला पकडून निर्जनस्थळी सोडले.