बोरी येथे जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निधीतून अंगणवाडी क्रमांक ५ च्या बांधकामासाठी ८ लाख ४९ हजार ८६० रुपयांच्या अंदाजपत्रकास १७ फेब्रुवारी, २०२० रोजी जि.प.ने मंजुरी दिली होती. त्यानुसार, ७ लाख ४७ हजार १८६ रुपयांचे या कामाचे कार्यारंभ आदेश बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी बोरी ग्रामपंचायतीला दिले होते. कनिष्ठ अभियंता बी.आर. पाटील, यांनी सदरील काम प्रत्यक्ष जागेवर नसताना न झालेल्या कामाची मोजमापे नोंदविली. या कामाची शिफारस प्रभारी उपअभियंता तथा शाखा अभियंता एस.एस. मोगरकर यांनी शिफारस करून विभागीय कार्यालयाकडे ५ लाख ९३ हजार १५५ रुपयांची देयके सादर केली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर, आ.मेघना बोर्डीकर यांनी २८ एप्रिल रोजी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती, तसेच यासाठी जि.प. उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी दबाव टाकून हे काम करून घेतल्याचे तक्रारीत म्हटले होते, तसेच त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार, टाकसाळे यांनी या प्रकरणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली चाैकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने आपला अहवाल तातडीने सीईओ टाकसाळे यांना सादर केला. त्यात कनिष्ठ अभियंता पाटील, उपअभियंता मोगरकर आणि ग्रामसेवक प्रल्हाद सोळंके हे पूर्णत: दोषी असल्याचे सिद्ध होत असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्या आधारे सीईओ टाकसाळे यांनी कनिष्ठ अभियंता पाटील, उपअभियंता मोगरकर आणि ग्रामसेवक प्रल्हाद सोळंके या तिघांनाही ३० एप्रिल रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, २४ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पाटील, सोळंके यांचे निलंबन?
या प्रकरणात कनिष्ठ अभियंता पाटील आणि ग्रामसेवक सोळंके हे पूर्णत: दोषी असल्याचे स्पष्ट झाल्याने, त्यांचे निलंबन अटळ असल्याचे समजते. सोमवारी उशिरा किंवा मंगळवारी याबाबतचे आदेश निघण्याची शक्यता आहे, तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी होण्याचीही शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पैसे ग्रा.पं.च्या खात्यावरच- चौधरी
अंगणवाडीसाठी आलेला निधी अद्यापही ग्रामपंचायतीच्या खात्यावरच आहे. हा निधी उचलून उचलून अपहार झालेला नाही. या प्रकरणी दोषी असेल, त्याच्यावर प्रशासन कारवाई करील, परंतु अधिकाऱ्यांवर सातत्याने दबाव टाकून त्यांना का त्रास दिला जातोय?