परभणी : एकदा कोरोना झाल्यानंतर तो पुन्हा होत नाही, असा समज खोटा ठरत असून, जिल्ह्यात १० जणांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांची काळजी आता वाढली आहे.
कोणत्याही संसर्गजन्य आजाराची लागण झाल्यानंतर त्या आजाराचा सामना करणाऱ्या ॲन्टीबॉडीज् शरीरात तयार होतात. त्यामुळे तो आजार पुन्हा होण्याची शक्यता तशी कमी असते. मात्र, कोरोना त्याला अपवाद ठरत आहे. मागील वर्षी कोरोना झालेल्या जिल्ह्यातील १० रुग्णांना पुन्हा कोरोना झाला आहे. त्यामुळे एक तर कोरोनाने त्याची लक्षणे बदलली किंवा ॲन्टीबॉडीज्चा प्रभाव कमी झाला, अशी दोन कारणे यात असू शकतात. कारणे काहीही असली तरी कोरोना दुसऱ्यांदा होण्याची शक्यता असल्याने काळजी वाढली आहे.
दुसऱ्यांदा कोरोना झाल्याचे काही उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे या रुग्णांना कोरोना होण्याची नेमकी कारणे शोधली जात आहेत. सध्या तरी रुग्ण कोरोनामुक्त करण्यावरच भर आहे.
डॉ. किशोर सुरवसे
निवासी वैद्यकीय अधिकारी, परभणी
नऊ महिन्यांपर्यंत ॲन्टीबॉडीज्चा प्रभाव
एकदा शरीरात कोरोनाचा विषाणू गेल्यानंतर त्याला प्रतिबंध करणाऱ्या ॲन्टीबॉडीज् तयार होतात. या ॲन्टीबॉडीज्चा प्रभाव ९ महिन्यांपर्यंत राहतो. मात्र, कोरोनाचा स्ट्रेन बदलला असल्यास ॲन्टीबॉडीज्ही काम करीत नाहीत. त्यामुळेच दुसऱ्यांदा कोरोना होण्याची शक्यता असते.
मास्क, सोशल डिस्टन्सिंग हाच उपाय
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी या नियमांचे पालन केल्यास कोरोनाचा बऱ्याच अंशी प्रतिबंध होऊ शकतो.
या नियमांचे पालन करावे, अशा सूचना प्रशासन वारंवार देत आहे. मात्र, नागरिकांमध्येच अजूनही फारसी जनजागृती झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून नियमांचे पलान करणे गरजेचे आहे.
घराबाहेर पडताना मास्क वापरणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्वत:चे सॅनिटायझर स्वत:जवळच ठेवून त्याचाही वारंवार वापर केल्यास बऱ्याच अंशी कोरोनाचा संसर्ग कमी होऊ शकतो.