- विनायक पाचलग
सध्या जागतिक मंदीचं वारं जोरानं घोंगावतं आहे. मंदीच्या इंटेसिटीबद्दल लोकांच्यात मतभिन्नता असली तरी मंदी आहे हे सगळ्यांना मान्य आहे. याचा अर्थातच सर्वाधिक परिणाम होतो तो नोकर्यांवर. एव्हाना इथून इतके लोक काढले, तितके लोक काढले जाऊ शकतात अशा हेडलाइन दिसू लागल्या आहेत. त्यामुळे, या मंदीत आपली नोकरी टिकवणं आणि मग यात काही संधी आहे का ते पाहणं हा आपला प्राधान्यक्र म असला पाहिजे.या कालावधीत कोणाच्या नोकर्या टिकतात? किंवा टिकतील?तर जी माणसं कंपन्यांसाठी ‘मस्ट हॅव’ असं काम करत असतात त्यांच्या नोकर्या टिकतात. उदाहरणार्थ जर का तुम्ही एका एमआयडीसीत काम करत असाल आणि रोज ज्यापार्टचं काम होणार आहे तो पार्ट तुम्ही डिझाईन करत असाल तर तुमच्या नोकरीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. पण, हेच जर का तुम्ही एखाद्या मोठय़ा कंपनीत आहात, आणि त्यांच्या ‘समाज सेवा’ विभागाचं काम बघत असाल तर तुमच्या नोकरीवर गदा येऊ शकते कारण तुमचे काम हे ‘मस्ट हॅव’मध्ये नसते तर ‘गुड टू हॅव’ या कटगेरीत असतं. सगळे चांगलं चालू असताना करायची कामं म्हणजे ही गुड टू हॅव कामं आणि त्याला लागणारी माणसं. त्यामुळे, आता याक्षणी आपण स्वतर्ला हे विचारलं पाहिजे की ‘माझ्याशिवाय मी जिथे काम करतो त्या कंपनीचं नक्की काय अडतं?’ ते जर का अडत नसेल तर थोडं टेन्शन नक्की आहे.आता आपण मस्ट आणि गुड टू मधला फरक पाहिला. आता जर का आपल्याला गुड टू मधून मस्टला शिफ्ट व्हायचं असेल (आणि नोकरी वाचवायची असेल) तर काय करावं लागेल? तर त्यासाठी आपल्याला त्या कंपनीला लागणारी आणि आपल्याला जमू शकणारी नवी स्किल्स शिकावी लागतील. आज जर का चार काम एकच माणूस करू शकत असेल तर त्याची किंमत जास्त आहे. जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ वन ही नव्या जगाची गरज आहे. तुम्ही तुमच्या एका कामात परफेक्ट असलं पाहिजे आणि बाकीची इतर कामंसुद्धा तुम्हाला जमलीच पाहिजेत, असा याचा ढोबळ अर्थ. तर अशी कोणती नवी कामं आपण शिकू शकतो याची लिस्ट बनवायला घेणं फायद्याचं ठरेल.दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘फ्लेक्सिब्लिटी’ ! महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती अशी म्हण आहे. याचा मतितार्थ संकट काळात फ्लेक्झिबल राहणारा टिकतो हाच आहे. कामाच्या वेळा, कामाची ठिकाणं आणि कामाच्या पद्धती या तीन बाबतीत जर का आपण थोडे मऊ राहिलो तर कंपनीत आपली उपयोगिता टिकून राहू शकते.हे झाले मंदीत टिकून राहण्याचे काही मार्ग. पण, मंदी ही खरं तर एक मोठी संधी आहे. टिकून राहून ती संधीसुद्धा साधता आली पाहिजे. ती संधी अशी की, या पुढील वर्षभरात एकुणातच डिमांड स्लो असेल आणि त्यामुळे कामाची गती मंद असेल. अर्थात आपल्या हातात रिकामा वेळ खूप मिळेल. याच सदरात गेले काही आठवडे आपण वेगवेगळ्या स्किल्स अपडेट करण्याविषयी बोललो आहे. ते सगळे स्किल्स शिकायची योग्य वेळ जणू निसर्गानेच आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे आताचा जास्तीत जास्त वेळ भविष्यासाठी स्वतर्मध्ये इन्व्हेस्ट करणं फायद्याचं ठरू शकतं. या कालावधीत मार्केटचा फुगा फुटतो आणि जेन्यूईन माणसं टिकून राहतात. हे अर्थचक्र फिरलं अर्थात पुन्हा तेजी आली की मंदीत गेलेले दहा पट भरून काढता येते. त्यामुळे, आतापासून त्या तेजीच्या तयारीत राहिले पाहिजे. उदाहरणार्थ वाहन उद्योगामुळे आता आलेलं स्लो डाउन हे पेट्रोल - डिझेलच्या गाडय़ापासून ते इलेक्ट्रिक व्हेईकलला जायच्या ट्रान्झिट पिरियडमध्ये आहे. उद्या एकदा भारतात इलेक्ट्रिक व्हेईकल स्थिरावल्या की पुन्हा हे क्षेत्न उभारी घेणार आहे. त्यामुळे, त्या नव्या इकोसिस्टीमला काय लागतं याचा अभ्यास आणि तयारी आताच करून ठेवली तर त्यावेळी तुम्ही मार्केटवर राज्य करू शकाल.. हीच बाब प्रत्येक क्षेत्नात लागू होते.आणि तुम्ही जर का अजून विद्यार्थी असाल आणि जॉब मार्केटमध्ये अजून आला नसाल तर अजून 2-3 वर्षात काय लागेल याचा अभ्यास आताच करायला हवा. त्या दृष्टीने आपण तयार व्हायला हवं !! थोडक्यात काय, तर वेळ कसोटीची आहे; पण रात्नीच्या उदरात उद्याचा उषर्काल आहे आणि तो उज्जवल आहे अशी आशा करूया.