माझ्या मुलीला प्लीज व्हॉट्स अँपचं महत्त्व सांगाल.?
‘‘पुस्तकी अभ्यासाला हल्ली काय महत्त्व उरलंय हो? रट्टा मारून नव्वद टक्के तर काय आजकाल ‘अँव्हरेज’ पोरगं पण आणतं..आजच्या काळात सक्सेसफुल व्हायचं तर मुलांची पर्सनॅलिटी ऑलराउंडर, डॅशिंग आणि डायनॅमिकच हवी.’’
अनेक जाणकार पालकांचं हल्ली ठाम मत आहे. आपल्या जेमतेम अकरावी-बारावीतल्या मुलाला किंवा मुलीला घेऊन पालक सध्या अनेक करिअर कौन्सिलरचे उंबरठे झिजवताहेत. मुलामुलींना सोशल नेटवर्किंगच्या वर्कशॉपला काही हजार रुपये फी भरून पाठवताहेत.
आपल्या मुलामुलींचा सोशल नेटवर्किंग नावाचा विषय त्यांना पक्का करून घ्यायचाय. म्हणूनच तर स्वत:ला सोशल नेटवर्किंग येवो ना येवो, फेसबुकही वापरता न येवो मुलांना मात्र आलंच पाहिजे म्हणून पालकच मुलांना महागडे स्मार्टफोन घेऊन देत, त्यावर इंटरनेटचे पॅक मारून देऊ लागलेत.
नव्या काळात आपला सगळा संपर्क ‘ऑनलाइन’ पाहिजे, आपण ‘ऑनलाइन’ जगात नुस्तं दिसून उपयोग नाही तर तिथं आपला ठसा उमटवला पाहिजे, लोकांना सतत दिसत राहिलं पाहिजे तर आणि तरच आपल्याला नव्या करिअरसंधी मिळतात. लोकांवर आपलं इम्प्रेशन पडतं. असं जे काही अवतीभोवती कानावर पडतं, ते पालकांनी फारच गांभीर्यानं घेतलेलं दिसतंय.
त्यामुळे धास्तावलेले पालक मुलांच्या स्मार्टफोनच्या वापराविषयी तक्रार करण्यापेक्षा त्यांनी व्हॉट्स अँप वापरावं, सोशल आणि व्होकल असावं म्हणून प्रयत्न करू लागलेत. आणि जी मुलं हे सारं वापरत नाहीत किंवा फार कमी वापरतात त्यांचे पालक तर आपल्या मुलांचां काहीतरी मोठा सिरीयस प्रॉब्लम आहे, असं असल्यासारखे त्यांना कौन्सिलिंगला घेऊन जात आहेत.
अनेक पालक तर मुलांना इंग्रजीचा, एक्स्प्रेशनचा क्लास लावायची आणि चक्क स्पीच थेरपीसाठी पाठवण्याची तयारी करत आहेत.
हेतू हाच की, नव्या ‘कनेक्टेड’ जगात आपलं पोरगं ‘दिसावं’, ‘ऐकू जावं’.
तसं झालं नाही तर आपलं हुशार मूल मागे पडेल आणि त्यातून त्याचं करिअरही मागे पडेल अशी पालकांना भीती वाटते आहे.
अशा पालकांची समजूत घालणं तसं मुकिच, पण साधी गोष्ट आहे. सोशल नेटवर्किंग कितीही केलं तरी सांगण्यासारखं काही असेल तर तिथंही लोक ऐकतील.
वायफळ गप्पा मारणारे तिथे कमी नाहीत, त्या गर्दीत आपली भर कशाला?
विचारा स्वत:ला.