हुशार मुलांच्या ‘टेस्ट’चा निकाल ‘ढ’ कसा लागतो?
शालेय काळ संपता संपता मुला-मुलींच्या मनात करिअरचे विचार जास्तच जोरात घोळायला लागतात. आपण भावी आयुष्यात काय करणार आहोत, आपल्याला साधारण किती टक्के मार्कमिळतात, अजून किती मिळू शकतील, उपलब्ध संधींमधून काय करता येईल, आपल्याला नक्की काय आवडतं, असे विचार सुरू होतात. आत्ताचे पालक मुलांची अॅप्टिटय़ूड टेस्ट करून घेतात.
एखाद्या ठिकाणी मनासारखा निर्णय हाती आला नाही किंवा त्यातून कन्फ्यूजनच जर वाढलं तर पालक अजून दुस:या कौन्सिलरकडे जातात, तिथं पुन्हा टेस्ट करतात, तर निकाल पुन्हा वेगळाच येतो
आणि मग पालकांपुढे आणि मुलांपुढेही प्रश्न निर्माण होतो की, आता करायचं काय?
मुळात हा टेस्टचा रिझल्ट वेगवेगळा का आला?
कौन्सिलरच चांगले नव्हते की काय?
अनेकदा तसं नसतं?
ही टेस्ट कशी, कोणी घेतली आहे याला महत्त्व आहेच. प्रोफेशनल कौन्सिलरकडून ती टेस्ट करून घ्यायची असते. पण त्या कौन्सिलरपेक्षाही महत्त्वाचं हे असतं की, ती टेस्ट देताना मुलांनी कितपत विचार करून आणि प्रामाणिक उत्तरं दिली आहेत. आणि ती प्रामाणिक उत्तरंच सगळ्यात महत्त्वाची असतात.
काही ‘खोडकर’ मुलं असतात, जी मुद्दामच चित्रविचित्र उत्तरं देऊन ठेवतात. त्यांना वडिलांनी दामटून टेस्टला आणलेलं असतं.
पालक आणि मुलं यांच्यात एकवाक्यता नसते, पालक आपली मतं मुलांवर लादत असतात. मग वडिलांना धडाच शिकवायचा, त्यांचा अंदाज चुकवायचा, म्हणून मुलं खोडसाळ उत्तरं देतात. त्यातून त्यांच्या मनाचा आणि साहजिकच त्यांच्या भावी करिअरचाही थांगपत्ता या टेस्टच्या रिझल्टमधून लागत नाही. पालकांचा अजूनच गोंधळ होतो.
रिझल्टचे निकाल वेगवेगळे का येतात, याचं हे कारण असतं!
दहावीनंतर आपल्या मुलाने सायन्सला जावं. आयआयटीला जावं ही बाबांची महत्त्वाकांक्षा. मुलाला बाबा जे म्हणतात ते अजिबात पटत नाही. त्यामुळे तो एकाही प्रश्नाचं धड उत्तर देत नाही. या उपद्व्यापामुळे उत्तरंही अर्थातच चुकीची आली. ही चुकीची उत्तरं त्याला हवीच होती. बाबांना मात्र कळेना आपला मुलगा एवढा हुशार. पण टेस्टचा रिझल्ट असा का आला,
त्यामुळे हे लक्षात ठेवायला हवं की, खोटी उत्तरं दिली की, आपला निकाल चुकणार, अंदाज गडगडणार!
त्यामुळे खरंतर पालकांनी अशा टेस्टपूर्वी काही न बोलणं हेच बरं असतं!
‘कल’ फक्त पहायचा, निर्णय मुलांवरच सोपवलेला बरा!
टेस्टच्या निकालात
एकाहून अनेक
ऑप्शन्स आले
तर?
एका मुलीने बारावीनंतर अशीच अॅप्टिटय़ूड टेस्ट दिली होती. पण त्यामध्ये इंजिनिअरिंगही सुचवलं होतं आणि फॅशन डिझाइनिंगही. त्यामुळे तिला काय करावं हे कळेना. प्रत्यक्षात एका चांगल्या शाळेने तिला स्पोर्ट्स टीचर म्हणून नोकरी दिली. ती स्पोर्ट्समधली तिची शंभराहून अधिक सर्टिफिकेट्स बघून.
असं काही झालं की, मुलं आणि त्यांचे पालक गोंधळतात की, नक्की करिअर कुठलं निवडायचं? कुठल्या कोर्सला अॅडमिशन घ्यायचे.
खरंतर या टेस्ट म्हणजे फक्त ‘कल’ तपासणा:या चाचण्या असतात. आपल्याला एकच गोष्ट येते आणि बाकी काहीच येत नाही, असं होत नाही. या टेस्ट म्हणजे फक्त हे शोधायचं असतं की, जास्त कल कुठं आहे? कुठल्या विषयात जास्त गती आहे.
त्यात आता संधी इतक्या वाढल्या आहेत, अनेक ऑप्शन्स आहेत. आपला कल आणि आपली गुणवत्ता पाहून त्यापैकी काही ऑप्शन्स सुचवले जातात.
पण, त्यामुळे प्रश्न पडतो की, नेमकं निवडायचं काय? टोकाचे करिअर कसे काय हे कौन्सिलर सुचवू शकतात.
पण ते सुचवणं चूक नसतं.
कारण मल्टिपल इंटिलिजन्स. एकूण आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात आणि त्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे आपण.
मल्टिपल इंटिलिजन्स आणि अॅप्टिटय़ूड एकत्र ठेवून पाहिलं तर कळतं की, आपला नेमका कल कुठं आहे?
म्हणजे इंजिनिअरला पण स्पॅटियल आणि व्हिज्यूअल म्हणजेच कल्पनाचित्र बुद्धिमत्ता महत्त्वाची असते आणि फॅशन डिझायनरलापण!
रिकाम्या जागेचा वापर करून तिथं काय आणि घडवणार हेही बुद्धिमत्ता ठरवते.
त्यामुळे ज्याची ही बुद्धिमत्ता चांगली ते दोन्ही प्रकारची कामं करू शकतात. म्हणजे ऑप्शन्स दोन्ही आहेत, त्यातून निवडायचं काय, आपल्याला जास्त काय आवडेल हे आपल्यालाच ठरवावं लागतं!
एकावेळेस यासाठी दोन ते तीन बुद्धिमत्ता काम करतात, पण त्यातही ज्याकडे कल जास्त ते करिअर आपण निवडतो!
निवडायला हवं!!
योग्य कौन्सिलर
आणि योग्य टेस्ट
निवडायची कशी?
हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न.
अॅप्टिटय़ूड टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट करून घेणं फायद्याचं ठरतं. त्यातून आपला कल कळतो.
पण या टेस्ट करायच्या कुठं?
1) हल्ली अनेक प्रोफेशनल कौन्सिलिंग सेण्टर्स आहेत, तिथं या टेस्ट करायला काही हरकत नाही.
2) काही ठिकाणी या टेस्ट वैयक्तिक स्वरूपात घेतल्या जातात. तर काही ठिकाणी एकदम अनेक विद्याथ्र्याना ऑनलाइन टेस्टला बसवलं जातं. ऑनलाइन परीक्षाच घेतली जाते.
3) उत्तम प्रोफेशनल टेस्ट या वेगवेगळ्या रीतीनं प्रश्न विचारतात. त्यामुळे योग्य कल सापडू शकतो, अर्थात प्रामाणिकपणो खरी खरी उत्तरं द्यायला हवीत.
4) मात्र नुसत्या टेस्ट दिल्या, निकाल हाती आला काम झालं, असं होता कामा नये. या निकालानंतर समुपदेशन केलं जातं. कोणत्याही पद्धतीने टेस्ट झाली तरी समुपदेशन महत्त्वाचंच. कारण यामध्ये आपल्याला प्रश्नांची तोंडी उत्तरं मिळवता येतात आणि योग्यप्रकारे आपला कल समजून घेऊन मग करिअरची वाट निवडता येते.
टेस्टनंतरही ‘कन्फ्यूजन’
कायम राहिलं तर?
टेस्ट केल्या, रिझल्ट हाती आले. त्यातूनही वेगवेगळे करिअर ऑप्शन्स समोर दिसताहेत.
सगळेच आकर्षक. मग त्यातून नक्की काय निवडायचं?
पालकांचं ऐकायचं की स्वत:चं की, मित्रंचं?
असे प्रश्न असतातच. त्यातून अनेकदा निर्णय घेणं अवघड.
रिझल्ट हाती पडल्यावर निर्णय घेताना ही तीन सूत्रं लक्षात ठेवाच.
1) टेस्टचा निकाल काहीही म्हणो, आपण स्वत:ला खूप आधीपासून ओळखतो. त्यामुळे आपलं मन काय म्हणतं, यावर भरवसा ठेवा.
2) आपल्याला वाटतं खूप पण प्रॅक्टिकली काय शक्य आहे ते पहा. व्यवहार महत्त्वाचाच, पैशाची गणितंही. त्यामुळे त्यांच्याशी काय मेळ खातंय ते पहा.
3) कुणी काहीही म्हणो, अगदी पालकही. आपल्या मनाचा कौल आपण घ्यायचा, गांभिर्यानं जबाबदारीही घ्यायची!