रश्मी बन्सल. तरुण मुलांच्या आवडत्या लेखिका. स्वत: उद्योजक असलेल्या रश्मीने तरुणांच्या व्यावसायिक जगात होत असलेल्या बदलांवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. स्टे हंग्री-स्टे फुलिश, कनेक्ट्स द डॉट्स यासारखी अत्यंत लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत! बदलत्या व्यावसायिक जगात करिअर करताना उपयोगी पडणारी सूत्रं त्या सांगताहेत, खास ‘ऑक्सिजन’साठी !
अॅटिटय़ूड.
- हा एकच शब्द हवा तुमच्याकडे!
यशस्वी व्हायचंय, उत्तम करिअर करायचंय तर या शब्दापलीकडे दुसरं उत्तरच नाही!
मला अनेकदा तरुण मुलं विचारतात,
‘सक्सेसफुल करिअर करायचं तर आपल्याकडे काय हवं?’
त्याचं उत्तर हेच की, त्या करिअरसाठी आवश्यक अॅटिटय़ूड तुमच्याकडे हवा! तो नसेल आणि फक्त डिग्री घेऊन जर तुम्ही ते करिअर करायला निघाल तर तुमच्या वाटय़ाला फक्त ‘चाल से’ यश येईल! चिकटून रहालही तुम्ही त्या कामाला, पण मिळमिळीत यश आणि जेमतेम पैसा यापलीकडे दुसरं काहीही मिळणार नाही!
म्हणून तर अॅटिटय़ूड हवा. जे काम आपल्याला करायचंय ते अत्यंतिक मेहनतीनं आणि एक्सलण्ट करायचं आणि त्या क्षेत्रतलं एक्स्पर्टच व्हायचं ही वृत्ती हवी!
आणि हवा त्या कामासाठी आवश्यक तो स्वभावही हवाच!
अबोल माणसांनी केवळ पैसा मिळतोय म्हणून एमबीए केलं तरी उद्या काम करताना त्याला असंख्य अडचणी येणारच!
त्यामुळे आपल्याला जे आवडतं ते करा; हा झाला साधासोपा नियम!
मात्र या नियमाच्या पोटात एक शब्द दडलेला आहे, पैशाचं काय?
खरं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळत नाही म्हणून तरुण मुलं आणि त्यांचे पालक एक द्विधामन:स्थितीत येतात, पैसे मिळवून देणारं काम की कमी पैसे मिळवून देणारं काम?
या प्रश्नाचं उत्तरही पुन्हा आपला अॅटिटय़ूडच देतं, जे काम करून आपल्याला आनंद मिळणार आहे, त्या कामात (इतरांना जसे मिळतात तसे) जास्त पैसे मिळायलाच हवेत ही अट ठेवली तर खरं उत्तर कसं मिळेल?
विशेषत: जी मुलं क्रिएटिव्ह फिल्डमध्ये आहेत.
त्यांना करिअरच्या सुरुवातीला नाहीच मिळणार बडेबडे पॅकेज!
मात्र काही वर्षे धीर धरून काम केलं, चिकाटी आणि गुणवत्ता असली तर पुढे उत्तम पैसे, नावलौकिक वाट पाहत असतंच!
मुद्दा काय,
यू शूड डू व्हाट यू लव्ह!!
आपल्याला काय आवडतं,
हे कळणार कसं?
सोप्पंय! स्वत:शी बोला!
ज्याला सेल्फ इण्ट्रोसेप्शनला पर्यायच नाही!
इतरांना काय विचारायचं की, माङयात चांगलं काय आहे?
दुस:यांना काय माहिती, तुम्हाला काय आवडतं?
ते फार तर तुमचे दिसणारे गुण सांगतील, पण तुम्हाला आतून काय वाटतं, काय आवडतं हे इतर लोक कसे सांगणार?
त्याचं उत्तर हेच की, तुम्ही स्वत:ला विचारा, मेरा हुनर क्या है?
मात्र हा प्रश्न स्वत:ला विचारायचे कष्टच मुलं घेत नाहीत. कारण सोपं नाही ना या प्रश्नांचं उत्तर देणं, त्यापेक्षा ते सोपे पर्याय शोधतात.
आईबाबांना काय वाटतं ते विचारतात, मित्र काय करतात ते पाहतात, काही टेस्ट करतात.
हे सारं तर कराच, त्यात चूक काही नाही. झालीच तर यासा:याची मदतच होईल! मात्र त्यापेक्षाही महत्त्वाचं की, स्वत:ला विचारा की, माङयात काय गुण आहेत?
मी काय करू शकतो?
कदाचित इतरांच्या तुलनेत तुमचा गुण छोटा आहे असं वाटेलही, पण त्याच गुणाच्या जोरावर तुम्ही निवडलेल्या कामात सर्वोत्तम प्रगती करू शकता. आनंदी राहू शकता. मात्र अशी खरी उत्तरं देणं, मुळात स्वत:ला विचारणं, की आपण काय करू शकतो हेच मुलं टाळतात! पहिली चूक होते ती इथंच!
पदवी मिळाली,
पॅकेज कधी मिळेल?
जिथे दुसरी चूक होते ती ही पायरी!
अनेक मुलांना असं वाटतं की, इंजिनिअर, डॉक्टर, एमबीए, सीए झालं आता लगेच आपल्याला बडय़ा पॅकेजची नोकरी मिळाली पाहिजे.
सध्या काळ असा की, ती मिळेलही. पण नोकरी मिळणं वेगळं, करिअर वेगळं. त्यामुळे पदवी मिळाली ही झाली एक सुरुवात त्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष कामात किती वेगानं शिकत जाता हे महत्त्वाचं.
त्यामुळे असं समजा की, कुठलीही डिग्री ही आपल्यासाठी फक्त ‘एण्ट्री लेव्हल’ आहे.
त्यानंतर तुम्ही किती मेहनत घेता, किती काम करता यावर तुमची प्रगती ठरते.
ते केलं नाही तर मग आपल्याला काहीच आवडत नाही, या शिक्षणात मन रमत नाही, त्या कामात मन लागत नाही या सा:यात वेळ फक्त वाया जातो!
आणि इतका महत्त्वाचा वेळ वाया गेला तर तुमच्या या कन्फ्यूजनची किंमत आयुष्यभर मोजावी लागते!!
तसं होऊ नये म्हणून करिअर निवडताना या काही गोष्टी खरं तर करून पहायला हव्यात.
आणि करिअर निवडल्यावरही करत रहायला हव्यात!!
- रश्मी बन्सल
खूप गोष्टी आवडतात, त्यातून काय निवडू?
आवडतं खूप सारं
पण बोअर होतं सगळंच!
ही बहुतेक मुलांची तक्रार असते की, मला आवडतं खूप सारं! ब:याच गोष्टी येतातही, पण एकदा कोर्स निवडला किंवा जॉब निवडला की, मला काही दिवसांनी ते सारं खूप बोअर होतं. वाटतं काहीतरी इंटरेस्टिंग करायला पाहिजे!
हे खरंय की, आयुष्यात एक्पेरिमेण्ट करण्याचं वयच असतं हे!
या वयात अनेक गोष्टी नाही करून पाहणार तर कधी करणार?
पण सतत ट्रॅक बदलत राहिलं, एक गाडी सोडून भलत्याच गाडीत जाऊन बसलं तर तुम्ही कुठंच पोहचणार नाही.
हे मान्यच करायला हवं की, काम आपल्याला कितीही आवडत असो, कितीही रोमॅण्टिक वाटो, त्या कामावर, विषयावर आपलं कितीही प्रेम असो; पण तरीही त्यात थोडंसं रुटीन, बोअरिंग, चॅलेजिंग असं काहीतरी असणारच!
सतत स्मूथ राइड आणि केक वॉक असं काही नसतंच!
आपल्याला आवडलेल्या कामातही हार्डवर्क असतं, मनासारखं सगळंच घडत नाही!
आणि जेव्हा आपल्या आवडत्या विषयात, आपल्या कामात आपल्या मनासारखं काही घडत नाही तेव्हाच खरं तर तो विषय आपल्याला किती आवडतो हे सिद्ध होतं. त्या कामावरचा आपला विश्वास कळतो.
त्यामुळे जे सगळ्यात जास्त आवडतं ते करा, त्याआधी प्रयोग करून, चार नव्या गोष्टी करूनही पहा.
पण जे सगळ्यात जास्त आवडेल, त्यावर ठाम रहा.
आणि जिद्दीनं, चिकाटीनं आणि सातत्यानं ते करा.
तरच त्यात करिअर होऊ शकेल!!
काहीच आवडत नाही; मनाविरुद्ध कसं वागायचं?
जे स्वीकारलं, तेच मनापासून करा!
हे सांगणं सोपं की, जे आवडेल तेच करा!
पण अनेकांना शेवटर्पयत नाहीच कळत की, आपल्याला नक्की काय आवडतं!
आपल्याला काय करायचंय!
अशावेळी काहीतरी निवडावंच लागतं.
पालक ते निवडून देतात. मग अनेकजण चाकोरीतलं शिक्षण घेऊन चाकोरीतल्या नोक:या शोधतात.
तेही काही वाईट नाही!
फक्त होतं काय की, हे ते स्वीकारतच नाही की, जे आपण करतोय ते आपल्याला आवडून घेतलं पाहिजे! सतत उदासी की मला काहीतरी ग्रेट करायचं होतं, पण जमलं नाही!
असं कशाला?
जे काम आपण निवडू, त्यावर प्रेम करायला शिकलंच पाहिजे!!
ते शिकलं तर मग आपण करू ते कामही चांगलं होईल, त्यात आपल्याला यश मिळेल आणि त्यातल्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आपण करू शकू!
म्हणजे तुम्ही अबोल, शांत असून केलं ना मार्केटिंगमध्ये एमबीए. मग आता प्रोफेशनली बोलायला शिका. कामापुरतं बोला, ते स्किल शिका!
त्यातूनही करिअर बनतंच!
नुस्तं मला हेच आवडत नाही, मला हे करायचंच नव्हतं असं म्हणत रडत बसलं तर काहीच घडणार नाही!!
कुणाला विचारायचं, कुणाशी बोलायचं?
स्वत:शी बोला, फक्त पाच मिण्टं!
किती टेस्ट. किती प्रकारच्या चाचण्या, त्यांचे निकाल, त्यावर चर्चा, अनेक लोकांचे सल्ले असं काय काय करता तुम्ही करिअरचा निर्णय घेताना!
मात्र स्वत:शी बोलत नाही.
ज्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या आतून मिळणार आहेत त्यांची उत्तर तुम्ही बाहेर शोधता. तुमचं रेस्टलेस मन पळत असतं, सतत अस्वस्थ. कशाचीच खात्री वाटत नाही. आपल्या निर्णयाचीही नाही. स्वत:ला काही ठरवायचीच भीती वाटते. खूप अवघड वाटतं ते सारं.
आणि मग आपण पळत राहतो, सतत. स्वत:पासून!
आणि कितीही पळालं तरी आपल्याला चांगलं वाटेल असं उत्तर मिळत नाही.
कारण तेच, जे उत्तर आपल्या आत आहे त्याचं उत्तर आपण बाहेर शोधतो!
यावर उपाय काय?
शांत बसा!
रोज सकाळी 15 मिण्टं डोळे मिटून फक्त शांत बसा.
एकदम शांत.
प्राणायाम करा. श्वसनाचे व्यायाम करा.
स्वत:च्या मनात जे विचार येतात ते येऊ द्या.
स्वत:शी बोला.
असं केलं तर तुमचं मन स्थिर व्हायला मदत होईल.
आणि जे उत्तर तुम्हाला बाहेरच्या जगात मिळत नाही, ते तुम्हाला मिळेल. स्वत:कडूनच!!
पालकांना कसं समजवायचं? ते ऐकतच नाहीत!
ऐकतील, पण त्यांना पटलं तर!
हा घरोघरचा झगडा. मुलांना करायचं असतं भलतंच,
पालक म्हणतात हेच कर!
तिथं मोठं भांडणं होतं!
पालकांना वाटतं ज्यात करिअर आहे, पैसा आहे तेच मुलांनी करावं, मुलांना वाटतं यांना काही कळतच नाही!
आणि अनेकदा खरंच पालकांना समजावणं अवघड असतं इतकी त्यांची मतं ठाम असतात.
मात्र तरीही पहिल्यांदा हे मान्य करून टाकलं पाहिजे की, पालक काही मुलांच्या विरोधात नसतात. आपल्या मुलानं मन मारून मुकाट जगावं असं काही पालकांना वाटत नाही.
त्यामुळे तुम्हाला जर त्यांना जे पटत नाही तेच करायचं असेल तर भांडून उपयोग नाही. तुमचा निर्णय त्यांना पटायला हवा आणि त्यासाठी तुम्ही प्रय} केले पाहिजेत!
त्यासाठी काही गोष्टी करून पहा.
1) सगळ्यात महत्त्वाचं वाद थांबवा, भांडणं थांबवा. शाब्दिक चर्चा आणि आपला आवेग आवरा.
2) आपल्या पालकांना विनंती करा की, मी म्हणतो ते शिक्षण ज्यांनी घेतलंय त्यांना भेटायला चला. तशी भेट घडवून आणा तुमच्या पालकांना कळू तर द्या की, ते तुम्ही म्हणताय ते काम असतं कसं? ते काम त्यांना प्रत्यक्ष दाखवण्याचा प्रय} करा.
3) जिथे तो कोर्स चालतो तिथल्या प्राध्यापकांना भेटवा. त्यांच्याशी बोलू द्या.
4) त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्या, ते आपले शत्रू नाहीत हे मान्य करा आणि त्यांना हे पटवून द्या की, तुम्ही म्हणताय ते केल्यानं तुमचं नुकसान होणार नाही.
5) तुम्ही म्हणताय तो कोर्स तुमच्या आासपास चालत नसेल तर जिथं चालतो तिथं जाण्यासाठी पैसे जमवा. काम करा, तुम्ही स्वत: कमवलेल्या पैशातून पालकांना तिथं घेऊन जा.
6) मुख्य म्हणजे तुमचा सिरियसनेस दिसू द्या. तुम्ही गांभीर्यानं ते काम चांगलं कराल, शिक्षण पूर्ण कराल असा विश्वास त्यांनाही वाटायला हवाच.
7)आपण एक गाडी घेतो तर किती शोधतो, अनेक गोष्टी पाहतो. पण ज्यात करिअर करायचं असं म्हणतो त्याविषयी आपल्याला काहीच माहिती नसते, ती कुणी मिळवायची!
ती मिळवा, पालक आपोआप तुमच्या बाजूनं येतील, निदान तुमचं ऐकून तरी घेतील!