कल्पना करा,
तुम्ही टाइम मशिनमध्ये
बसला आहात.
आणि फ्लॅशबॅकमध्ये घेऊन न जाता
ते टाइम मशिन तुम्हाला
एकदम भविष्यात पुढे घेऊन जातं.
जास्त नाही फक्त दहा वर्षं.
कॉलेजातून बाहेर पडून तुम्हाला
आता दहा वर्षं होऊन गेली आहेत.
केसात थोड्या थोड्या
चांदीच्या तारा चकाकताहेत.
पोट थोडं सुटलंय.
नाही म्हणायला,
बरी नोकरीबिकरी करताय तुम्ही,
पैसेही चांगले कमावता आहात.
पण ऑफिसात जाता,
घरी येता.टीव्ही पाहता, झोपून घेता.
ना मित्रांना भेटायला वेळ आहे,
ना पिकनिकला जाऊ म्हटलं
तर बॉस रजा देतो.
शांत-निवांतपणाच आयुष्यात
उरलेला नाही.
फार्फार तर मित्रमैत्रिणींना तुम्ही
व्हॉट्स अँपवर, फेसबुकवर म्हणता,
‘यार काय दिवस होते तेव्हाचे,
वेळच वेळ होता.
आता मरायला फुरसत नाही.’
मग एक दिवस तुम्हाला,
एका बड्या कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यूचा कॉल येतो.
मुलाखत घेणारा, तुम्हाला विचारतो.
‘कॉलेजात काय काय केलं?’
- ‘काही नाही.’ - तुम्ही सांगता.
‘नाटकात काम केलं?’
- नाही.
‘वक्तृत्व स्पर्धा?’
‘गणपतीत नाचलात?’
‘गाता येतं?’
‘इलेक्शन लढवलं? मारामार्या केल्या?’
‘पुस्तकं वाचली?’
‘कविता केल्या?’
‘कुणाची भाषणं
कधी ऐकली?’
‘एखादा इव्हेण्ट
ऑर्गनाईज केला?’
‘काही नवीन उपक्रम राबवले?’
‘काही मागण्या,
धरणं, मोर्चे?’
-‘नाही’.-यापलीकडे तुमच्याकडे
काही उत्तर नसतं. आणि तुमची शैक्षणिक पात्रता असूनही ते तुम्हाला नाकारतात, तुमचा ड्रीम जॉब हातचा जातो.
हे इमॅजिनेशन थांबवून कल्पना करा की, असं खरंच झालं तर.
कॉलेज आणि घर अशा चकरा मारत, कट्टय़ावर चकाट्या पिटत, खिदळत, पाच वर्षं सहज सरतील.
पण या पाच किंवा सात वर्षांत तुम्ही काय केलं?
डिग्रीच्या कागदापलीकडे काय मिळवलं?
कुठल्या आठवणी जमवल्या?
स्वत:चं व्यक्तिमत्त्व बहरावं,
विकसित व्हावं म्हणूून काय केलं?
कॉलेजचं व्यवस्थापन तुमच्यासाठी काय करतं, हा पुढचा प्रश्न,
तुम्ही स्वत:साठी काय कमावलं हा खरा प्रश्न.
दहा वर्षांनी तुम्हाला हे प्रश्न पडू नयेत.
आणि कॉलेजच्या दिवसांचं सोनं करत, स्वत:ला पूर्ण विकसित करण्याची संधी मिळावी,
म्हणून हा खास अंक.
तुमच्या डोक्यात खर्याखुर्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेण्टचा
किडा सोडणारा.
तो किडा मोठा व्हावा
वळवळत सतत तुम्हाला छळत रहावा याच शुभेच्छा.
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com