अॅपलच्या इव्हेंटकडे जगभरातील अॅपलचे फॅन्स अगदी डोळे लावून बसलेले असतात. याही वर्षी तमाम चाहत्यांना आणि माध्यमांना उत्सुकता होती ती अॅपलच्या एका नव्या गॅजेटबद्दल, ज्याचं नाव आहे अॅपल वॉच. शेवटी ते अॅपल वॉच एकदाचं लॉँच झालं आणि नेहमीप्रमाणे चर्चा जगभर तापायला लागली की, अॅपलचं हे नवीन गॅजेट क्रांतिकारी आहे की नाही? चर्चा कसली वाद, भांडणंच सुरू झाली आहेत.
जगभरातलं तंत्रज्ञानातलं एक्सपर्ट पब्लिक कसं का भांडेना, आपल्याला त्यात फारसा इंटरेस्ट असण्याचं काही कारण नसतं!
आपलं म्हणणं एकदम वेगळं, एकदम प्रॅक्टिकल.
‘वेळ बघायचाय ना? मग मोबाइल आहे ना, त्यासाठी आता घड्याळ कशाला लागतंय!’
पण आता अॅअँपलनेच घड्याळ लॉँच केलंय म्हणजे मग ‘वेड्या, हे स्मार्टवॉच आहे!’ असं म्हणून थोडीबहुत चर्चा अगदी कॉलेज कट्टय़ावरही होतेच.
पण तरीही या वादात तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, घड्याळासारखं घड्याळ त्याची एवढी का चर्चा होते? नव्या तंत्रज्ञानाच्या काळात, या घड्याळात असं काय विशेष असणार?
मुळात घड्याळ आणि टेक्नॉलॉजी हे गणित काय आहे?
१) मनगटी नखर्याची नजाकत
खरं वेळ बघणं हा या घड्याळाचा मूळ हेतू नाहीच! ज्याप्रमाणे स्मार्टफोनचा मूळ हेतू बोलणं हा नव्हताच, त्याप्रमाणे अॅपल वॉचचा मूळ हेतू टिम कूक महोदयांनी सांगितल्याप्रमाणे वेळ बघणे हा नाहीच मुळी! एका दृष्टिक्षेपात हवी ती माहिती मिळावी, माहितीची देवाणघेवाण करणं सुलभ व्हावं हा या घड्याळाचा मनगटी हेतू. म्हणजे मोबाइल फोनचा वापर आपण घड्याळासारखा करू लागलो, आता घड्याळ घालून फोनवर बोला असं म्हणत हे घड्याळ आलं आहे.
त्यात अॅपल वॉच एडिशन या रेंजमधील घड्याळांच्या केसेस साध्यासुध्या सोन्यापासून बनलेल्या नाहीत. अॅपलने या सोन्याचंही पेटंट घेतलं आहे. या सोन्यात सिरॅमिकचे कण मिसळलेले आहेत. त्यामुळे या सोन्याला अधिक मजबुती मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा नुस्तं गॅजेट नाही तर महागडं गॅजेट, स्टेटस सिम्बॉल असं म्हणूनही या घड्याळाकडं पाहिलं जाईल.
आता ही सारी चर्चा वाचून तुम्हाला वाटलं असेल की, श्रीमंतांचे चोचले आपला काय संबंध त्याच्याशी?
तर तसं वाटावं असं हे प्रकरण सोपं नाही.
तुमच्या आमच्यासाठी बाजारात अनेक असेच स्मार्ट पर्याय उपलब्ध आहेत. आणि येणारा काळ हा अशाचा स्मार्ट वेअरेबल गॅजेट्सचा असेल!!
२) स्वस्त ऑप्शन्स, चायनीज पर्याय
३0-३५ हजार रुपये काय किंवा ६ लाख रुपये काय, ही चर्चेतली ब्रॅण्डेड घड्याळं नक्कीच महाग आहेत. त्यांच्या तुलनेत अँण्ड्रॉईड घड्याळं (स्मार्टफोनसारखीच) तुलनेनं बरीच स्वस्त आहेत. ही अँण्ड्रॉईड स्मार्टवॉचेस तर तुम्ही आजच्या आज खरेदी करू शकता.
यातलं सर्वात लोकिप्रय अँण्ड्रॉईड स्मार्टवॉच आहे ते मोटो 360. याची किंमत आहे जेमतेम १९,९९९ रुपये फक्त. याशिवाय, सॅमसंग, पेबल, आसूस या कंपन्यांची स्मार्टवॉचेस साधारण याच रेंजमध्ये मिळतात.
मजेशीर गोष्ट म्हणजे या स्मार्ट वॉचच्या लॉंचनंतर लगेच अँपल वॉचची कॉपी असणारी चायनीज घड्याळं मार्केटमध्ये आली आहेत. अलीबाबा.कॉम वर अगदी अॅपल वॉचसारखे दिसणारे चिनी बनावटीचे घड्याळ फक्त तीन हजार रुपयांत मिळू शकतं.
त्यामुळेच ब्रॅण्ड व्हॅल्यू कितीही असली, तरी घड्याळासाठी एवढा पैसा कोण खर्च करणार?
पण थांबा. लक्झरी घड्याळांचं मार्केट जगभरात फार मोठं आहे. स्वाच या स्विस कंपनीची ब्रेगे आणि ब्लॉंकपॉं यासारखी ऐतिहासिक घड्याळं काही लाख रुपयांना मिळतात. भारतात मर्यादित असलं तरी पूर्णपणे मेकॅनिकल असणार्या अशा मौल्यवान स्विस घड्याळांकडे जगभरात एक गुंतवणूक म्हणून बघितलं जातं. त्यामुळे मर्यादित संख्येतच उत्पादन होणार्या या स्मार्ट वॉच एडिशनची क्रेझ जास्त असणं उघड आहे.
३) घड्याळात अॅप्स? क्रेडिट कार्ड बाद?
अॅपल वॉचसोबत लॉँच झालेले अॅप्स पाहिले तर एक गोष्ट लगेच लक्षात येईल की, अॅप्सचं हे वेड आता घड्याळातही शिरलं आहे.
त्यातही तीन प्रकारची अॅप्स यात महत्त्वाची.
* आरोग्य - घालणार्याच्या हृदयाच्या ठोक्यांचा ट्रॅक ठेवणं, तुमच्या मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंगचा ट्रॅक ठेवणं, तुम्ही दिवसभरात केव्हा उत्साही असता आणि तुमच्या झोपेच्या सवयी कशा आहेत यासारख्या गोष्टी या वॉचद्वारे कळू शकतील. याशिवाय एक मजेशीर फिचर म्हणजे - ‘फार वेळ बसलात. आता जरा उठा’ असा अलार्म देण्याची सोय अॅपल वॉचमध्ये आहे.
* अॅपल पे - आय फोन सिक्स बरोबर लॉँच झालेल्या टेक्नॉलॉजीनं नोटाच काय पण क्रेडिट कार्डसुद्धा खिशात ठेवण्याला बाद केलंय. दुकानदाराकडे असलेल्या मशीनवर तुमचं घड्याळ घातलेलं मनगट फिरवलं की झाले पैसे कट. ट्रॅन्झॅक्शन झाल्याचं अॅपल वॉचच्या व्हायब्रेशनने तुम्हाला लगेच कळेल. येत्या वर्ष- दीड वर्षात यासारखी टेक्नॉलॉजी रूढ होणार हे निश्चित.
* कम्युनिकेशन - रस्त्यावर एखादा माणूस तुम्हाला तुमच्या घड्याळात बोलताना दिसला तर तो गुप्तहेर-बॉण्ड वगैरे कोणी नसून एक साधा, अॅपल वॉच बाळगणारा इसम आहे याची खात्नी बाळगा. व्हॉट्सअॅप आणि फोन कॉल या सगळ्या गोष्टी अॅपल वॉचवर शक्य आहेत. यापैकी कॉलसाठी सीमकार्ड लागत नाही. या सगळ्या गोष्टींसाठी अॅपल वॉच ब्लुटुथद्वारे तुमच्या आयफोनशी कनेक्टेड असेल.
याशिवाय आपण नेहमी वापरतो त्यातील बहुतेक अॅप्स या वॉचवर उपलब्ध होऊ शकतील.
अॅपल वॉचवर वॉच ओएस नावाची आयओएसवर आधारित ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्याबाबतीतही स्मार्टफोनसारखेच वर्ष- दोन वर्षात बाद हे धोरण असण्याचीच शक्यता जास्त. म्हणजे काय तर सध्या एकदम नवीनतम असलेली टेक्नॉलॉजी वर्ष- दोन वर्षात बाद ठरून नवीनच टेक्नॉलॉजी येणार. या नव्या जगात हे ‘आउटडेटेड’ होणं जरा जास्तच वेगानं घडतं आहे!
प्रॉब्लेम नं. १ घड्याळ चार्जिंगला लावलंय!
जुन्या घड्याळांना चावी दिली की ते विनातक्रार आपलं काम करायचे. नंतरच्या काळात आलेल्या घड्याळांमधेही एकदा चपटे सेल टाकले की विषय संपला. अॅपल वॉचचं तसं नाही. या महाराजांना आपल्या फोनप्रमाणे चार्ज करावं लागतं. ते चार्जर आहे साधारण १८00 रु पयांना. (एक मीटर लांब वायर हवी असेल तर १0 डॉलर एक्स्ट्रा!) बरं एवढं सगळं करून महाराजांची बॅटरी चालणार ती फक्त १८ तास! म्हणजे दररोज चार्जिंग आलंच. त्यामुळं हातावरचं सुंदर घड्याळ बघून एखाद्या सुंदरीनं वेळ विचारलीच तर ‘चार्जिंगला लावलंय घड्याळ’ असं म्हणायची वेळ येऊ शकते.
प्रॉब्लेम नं २
करा दीडदोन वर्षांनी अपडेट
स्मार्टफोनचा ट्रेंड पाहता कोणत्याही स्मार्टफोनला साधारण दोन अपडेट मिळतात. म्हणजे तुम्ही अँण्ड्रॉईड किटकॅट असलेला नेक्सस-४ घेतला तर त्याला अँण्ड्रॉईड लॉलीपॉप आणि आणखी एक मायनर अपडेट नक्की मिळणार. आयफोनचाही मामला काहीसा असाच आहे. या कंपन्या आपला नफा शाबूत ठेवण्यासाठी ग्राहकाने दर दीड-दोन वर्षांनी नवा फोन घेत फोन अपडेट करत रहावा अशी ही योजना असते.
- गणेश कुलकर्णी
Twitter - @ganeshkulkarni