आता फक्त आठवणी. धूसर. पण सुंदर.
स्वत:वर हसायला भाग पाडणार्या. आणि थोडी अक्कलही शिकवणार्या. खरं तर आता हसू येतंय म्हणून पण आता कॉलेजातून बाहेर पडल्यावर सांगायला हरकत नाही.
तेव्हा सांगितल्या असत्या की नाही, जरा शंकाच आहे..
दहावीला गेल्यावरच कॉलेजचे वेध लागले होते.. इतकी वर्षं मोठय़ा बहिणीकडून फक्त कॉलेजमधल्या गमतीजमती ऐकल्या होत्या. मुळात रोज छान-छान ड्रेसेस घालायला मिळणं हे सगळ्य़ात मोठं आकर्षण होतं. युनिफॉर्मला टाटा करायचे दिवस जवळ येत होते. त्याशिवाय वेगवेगळ्य़ा डेजची मजा, प्रॅक्टिकल्सच्या वेळी तयार होणारे ग्रुप, मग कॅन्टिनमधल्या गप्पा वगैरे वगैरे. आणि त्या कॅन्टिनमधल्या ग्रुपमधून कोणीतरी कोणाला तरी प्रपोज करणं, गिफ्ट्सची देवाणघेवाण, डायरीमध्ये जपून ठेवलेलं गुलाबाचं फूल, कोणी आपल्या खास मैत्रिणीला खूप गुलाब पाठवून रोझ क्वीन करणं, मित्नमैत्रिणींकडून मिळणारी छान-छान ग्रीटिंग्ज, पार्टी, पालक किंवा शिक्षक सोबत नसताना ट्रेकिंगला जाणं, पिकनिकला जाणं.. कित्ती काय काय करायचं होतं.. कॉलेजमध्ये जाऊन प्रेमात पडायचं असंही मनात कुठेतरी नक्की केलं होतं.
कुणाला सांगितलं नव्हतं पण होतंच मनात.
बाकीही एवढय़ा सगळ्य़ा गोष्टी ऐकल्या होत्या की कॉलेजमधलं आयुष्य थ्रीलिंग असणार असं वाटत होतं. त्यातच बिल्डिंगमधल्याच एका मित्नानं सांगितलं होतं की, त्याला पहिल्या दिवशी त्याच्या शाळेतल्या सीनिअर्सनं कसं ग्रॅण्ड वेलकम दिलं होतं. मग आपल्यालाही असं ग्रॅण्ड वेलकम मिळेल सीनिअर्सकडून असं वाटायला लागलं. स्वप्नं रंगवायला काय जात होतं. सगळ्य़ा सिनेमांमध्ये पहिला दिवस असाच कलरफुल असतो. आणि सिनेमाला आधार वास्तवाचा असतोच की त्यामुळे स्वप्नांचे इमले रचले जात होते. अगदी रॅगिंग झालं तर काय आणि कसं बोलायचं हेसुद्धा डोक्यात तयार होतं. रॅगिंगच्या विरोधात कायदे कडक आहेत म्हणा; पण तरी वेळ आली तर कशी स्मार्ट उत्तरं द्यायची याचीही थोडी फार प्रॅक्टिस केली होती. या सगळ्य़ाचं श्रेय दहावीला गेल्यावर करिअर काय निवडायचं हे फुकट सल्ले देणार्यांसोबत कॉलेजमध्ये कशी आणि काय धमाल करायची हे महत्त्वाचे सल्ले देणार्यांना जातं.
कॉलेजच्या पहिल्या दिवसासाठी दहावीच्या पहिल्या दिवसापासूनच मी बहुधा तयारी सुरू केली होती. परीक्षा संपल्यानंतर तर पॉकेटमनीमधून जमतील तसे वेगवेगळे टॉप्स, जीन्स, कुर्ते, शबनम, पर्स अशी थोडी फार खरेदी केली.. कॉलेजमध्ये किमान पिहले दोन आठवडे तरी कपडे रिपीट करायचे नाहीत असं ठरवलं होतं. पहिल्या पंधरा-वीस दिवसांमधलं इम्प्रेशन खूप महत्त्वाचं असतं हा समज डोक्यात फिट बसला होता. त्यामुळे तयारीही जोरदार केली. प्रसंगी बार्गेनिंग शिकून घेतलं. मुंबईतले फॅशन स्ट्रीट, लिकिंग रोड, कुलाबा कॉज वे मार्केट सगळं शोधून शोधून वॉर्डरोब रेडी केला. आणि या सगळ्य़ाचं फलित म्हणजे पहिला दिवस उजाडला. फार फंकी नाही पण फार काकूबाईही दिसायचं नाही असं ठरवून कॉलेजमध्ये प्रवेश केला. कॉलेजची अडमिशन घ्यायला मीच गेले होते बाबांसोबत त्यामुळे तेव्हा थोडाफार कॅम्पस नजरेखालून घातला होता. इथे कसे कपडे घातले जातात याचा अंदाज बांधला होता. त्यानुसारच पहिल्या दिवशी तयार झाले होते. तयारी केली तरी मनात थोडी फार धाकधूक होतीच. उत्सुकता होती.
कॉलेजच्या गेटवर अँडमिशन रिसिट दाखवून आत गेलो. आता काही तरी थ्रीलिंग घडणार. कदाचित मस्त बलून्स, रिबिन्स, वेलमकचे बोर्ड लागलेले असतील.
पण.. यातलं काहीच घडलं नाही.
फक्त एका ब्लॅकबोर्डवर फस्र्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी नाव आणि रोल नंबर चेक करून घ्यावा, अशी सूचना लिहिली होती. आयकार्डची सूचना लवकरच दिली जाईल असंही लिहिलं होतं. रोल नंबर पाहून आम्ही आमच्या वर्गात गेलो. वर्गात तरी किमान काही असावं. पण इथेही काहीच नाही. काही बावरलेले चेहरे. काही कॉलेज त्यांच्या मालकीचं असल्याचा आव आणणारे चेहरे. काही घाबरूनही न घाबरल्यासारखे दाखवणारे आमच्यासारखे चेहरे.
एवढंच. सिनेमात दाखवलेलं तसं काही नाही..
बिल्डिंगमधल्या मित्नानं सांगितलं होतं तसंही काही नाही..
सीनिअर्सनी आमची दखलही घेतली नव्हती.
फस्र्ट इयरचे विद्यार्थी कॉलेजमध्ये दाखल झालेत असं कोणालाही कळलं नव्हतं. सगळं कॉलेज आपल्या कामात मग्न. कोणी छान हॅण्डसम मुलगाही अजून दिसायला तयार नव्हता. कॅम्पसमध्ये एवढी गर्दी होती की अँडमिशनच्या वेळी दिसलेला कॅम्पस खूपच अनोळखी वाटला. त्यामुळे तिथे भटकायला जायचं तर टेन्शनच आलं.
पहिलं लेक्चर सुरू झालं. आता किमान प्रोफेसर तरी हॅण्डसम असावेत. पण घोर निराशा. एक मॅम आल्या आणि त्यांनी चष्म्याच्या फ्रेममधून सगळ्य़ा वर्गाचा अंदाज घेत न हसताच वेलकम केलं. पहिली पंधरा मिनिटं भलंमोठं लेक्चर दिलं.. पुढच्या तीन-चार लेक्चर्सना असंच झालं. आणि पहिला दिवस संपला. पहिल्या दिवशी ग्रुप जमेल, छान एकत्र कॅन्टिनला जाऊ असे विचार सगळे न पडलेल्या पावसात वाहून गेले. गुलाबी स्वप्नांचा चक्काचूर झाला होता. वाटलं शाळेचा प्रत्येक वर्षी आलेला पहिला दिवस बरा होता. किमान शिक्षक ओळखीचे असायचे. गप्पा मारायचे. इथे असं काहीच नाही. ना मित्रमैत्रिणी होते, ना ओळखीचं कुणी. एवढय़ा गर्दीत खूप एकेकटं वाटत होतं.
फार्फार तर ओळख करून घेताना शाळा कोणती, किती मार्क, कुठे राहतेस, कुठे राहतोस वगैरे नेहमीचे प्रश्न विचारत सगळ्य़ाचंच एकमेकांना जोखणं सुरू झालं. आता शाळेतल्यासारखे रेडी ग्रुप्स नसणार, हे ग्रुप्स बनायला वेळ लागेल हे लक्षात आलं. त्याहीपेक्षा मुळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आतापर्यंत ज्यांनी कॉलेजमधल्या गमतीजमती सांगितल्या त्यांनी त्यातले बोअरिंग किस्से सांगितलेच नव्हते. त्यांनी जे बोअरिंग होतं ते सगळं वगळलं. जे भंकस होतं ते सांगितलंच नाही त्यामुळे कॉलेज म्हणजे मजा असंच एक समीकरण डोक्यात तयार झालं होतं. सिनेमे पाहून तर असं वाटत होतं की, कॉलेजात गेलं की लाइफच बदलून जाईल. हेच सारं डोक्यात घेऊन मी कॉलेजमध्ये प्रवेश केला होता. आणि सगळं टाय टाय फिश झालं.
पण डोक्यातल्या सुदैवानं वास्तव वेगळंच हे माझं त्याचदिवशी लक्षात आलं. आणि मग डोक्यातल्या सगळ्या कल्पना बाजूला ठेवून दिल्या. कॉलेज कॅम्पस जसं होतं तसं पाहत गेले, अनुभवत गेले. मैत्री व्हायला वेळ लागला, तो दिला.
आणि मग तीन-चार महिन्यांनी कॉलेजमधला आमचा पहिलावहिला ‘ड’े सेलिब्रेट झाला तेव्हा मला खरं कॉलेजलाइफ एन्जॉय करायला मिळालं. तोपर्यंत मस्त ग्रुप जमला होता आणि खर्या अर्थानं कॉलेजातली धमाल सुरू झाली.
तुम्ही म्हणाल हे सारं मी मग आज का सांगतेय, तर माझा कॉलेजच्या पहिल्या दिवशी रसभंग झाला तसा तुमचा होऊ नये म्हणून. लोकं काय, नुस्ती गंमतजंमत सांगतात आणि आपल्यासारखे इनोसण्ट लोकं तेच खरं मानून काहीतरी भन्नाट होईल याची वाट पाहत बसतात.
तेव्हा कॉलेजच्या पहिल्या दिवशीचं जरा ‘रिअल’ पिर मनात ठेवा.
आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर मारण्यापेक्षा मोठ्ठी इनिंग खेळायचं पक्कं प्लॅनिंग करा.
सो, ऑल द बेस्ट.
- मृण्मयी
ऐसा होता तो नहीं.
१) कॉलेजच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला तुमचा प्रिन्स चार्मिंग भेटणार नाही, नाहीच भेटत हे लक्षात ठेवा.
२) कुणी तुमच्यावर फुलं उधळणार नाही, कुणीच तुमच्याशी प्रेमानंही बोलणार नाही.
३) पहिल्या दिवशी कॉलेजात जाम बोअरच होतं, फार काही थ्रिलिंग घडणार नाही.
प्लीज हे करूच नका.
१) कॉलेजात जायचं म्हणून एकदम ड्रास्टिक बदल स्वत:त करू नका.
२) हाय हिल्स वापरत नसाल तर वापरू नका, स्कर्ट आवडत नसेल तर उगीच घालू नका.
३) खूप मेकप करून जाऊ नका.
४) उगीच कॉलेजात रेंगाळू नका. काम झालं की पळा.
५) पहिला दिवस म्हणजे एक्सायटिंग हे मनातून काढून टाका. थंडा कर के खाओ,
इज द मंत्रा.